नागपूरच्या सागरने शिखर गाठले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Sagar kumbhar trekking

नागपूरच्या सागरने शिखर गाठले

नागपूर : नागपूरचा युवा गिर्यारोहक सागर कुंभारेने बर्फ व उणे २० डिग्री तापमानाचा सामना करत उत्तराखंडमधील २० हजार ९५५ फूट उंचीचे माऊंट ब्लॅक हे शिखर सर करण्याचा अनोखा पराक्रम केला. महाराष्ट्र नेव्ही युनिटचा एनसीसी कॅडेट असलेल्या सागरने ६३८७ मीटर उंचीचे हे शिखर ९ सप्टेंबरला चढायला सुरवात केली.

सहा दिवसांच्या चढाईनंतर तो १४ सप्टेंबर रोजी शिखरावर पोहोचला. उंच शिखरावर सगळीकडे बर्फ व ऑक्सिजन कमी राहात असल्यामुळे सागरला चढताना खूप अडचणी गेल्या. श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. सतत अपघात होण्याची भीती त्याच्या मनात होती. उल्लेखनीय म्हणजे, त्याने हे सहा दिवस केवळ बिस्किट्स, ड्राय फ्रुटस व चॉकलेट्स खावून काढलेत.

मात्र जिवासह कशाचीही पर्वा न करता जिद्दीने त्याने शिखर गाठले. गिर्यारोहकाच्या शारीरिक व मानसिक क्षमतेची परीक्षा घेणारे हे अभियान होते, असे सांगून सागरने मोहिम यशस्वी केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या कठीण व आव्हानात्मक मोहिमेत सागरसोबत भारतातीलच विजयप्रताप सिंग, मणी राणा, रघु बिष्ट व वेदांत रस्तोगी हे अन्य चार गिर्यारोहक होते. महाराष्ट्रातून सागर एकमेव गिर्यारोहक होता.

सागरने या मोहिमेची तीन महिन्यांपूर्वीपासून तयारी केली होती. फिटनेस वाढविण्यासाठी तो दररोज २० ते २५ किलो वजन उचलत होता. सागरने अनुभव मिळविण्यासाठी २०१७ मध्ये माऊंटअबू आणि गतवर्षी डिसेंबरमध्ये हिमाचल प्रदेशमधील सोलांग व्हॅलीतील १४ हजार ५०० फूट उंचीचे पातालसू हे शिखरावर चढाई केली होती. केडीके अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या सागरला लहानपणापासूनच साहसी खेळांबद्दल आकर्षण होते. भविष्यात यापेक्षाही आणखी कठीण साहसी मोहिमा फत्ते करण्याची इच्छा त्याने यावेळी बोलून दाखविली.