Nagpur : सांबर, मुंगुसाची शिकार केल्यास कठोर शिक्षा Nagpur sambar mongoose Harsh punishment Conservation Schedule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wildlife hunting permit

Nagpur : सांबर, मुंगुसाची शिकार केल्यास कठोर शिक्षा

नागपूर : वन्यजीवांची शिकार आणि तस्करीवर अंकुश बसावा व नामशेष होऊ पाहणारे वन्यप्राणी, पक्षी, सर्प प्रजातींचे संरक्षण, संवर्धन व्हावे या उद्देशाने केंद्र सरकारकडून भारतीय वन्यजीव कायद्यात काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. आता सांबर, कोल्हा, उदमांजर, मुंगूस, तरस आणि साळींदर सारख्या प्राण्यांनाही वन्यजीव संरक्षण अनुसूची-१मध्ये स्थान देण्यात आले आहे.

वन्यजीव कायदा १९७२ मध्ये झालेल्या काही सुधारणांमुळे वन्यप्राण्यांच्या बेकायदा व्यापारावर अंकुश बसण्यास मदत होईल, असा आशावाद वन्यप्राणी प्रेमींकडून व्यक्त केला जात आहे. शिक्षेच्या तरतुदींमध्येही बदल करीत शिक्षेचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

दंडाची रक्कमही २५ हजारावरून आता थेट लाखावर पोहोचली आहे. वन्यजीव कायद्यातील या सुधारणांमुळे यापूर्वी शेड्यूल-२ किंवा ४ मध्ये

सांबर, मुंगुसाची शिकार केल्यास कठोर शिक्षा

असलेल्या वन्यजीवांना थेट शेड्यूल-१मध्ये स्थान दिले गेले आहे. यामुळे या वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची स्थिती भविष्यात अधिक उंचावण्यास मदत होणार आहे.

राज्यप्राणी शेकरू अनुसूची-१ मध्ये

महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु यापूर्वी अनुसूची-२ मध्ये होता; मात्र, सुधारणेनंतर त्यास आता अनुसूची-१ मध्ये स्थान देण्यात आले आहे. यामुळे शेकरुच्या संवर्धनासाठी मदत होणार आहे. या प्राण्याचा संरक्षण दर्जा आता वाढविल्यामुळे वाघ, बिबट्याप्रमाणे त्यालाही स्थान दिले गेले आहे.

यासोबतच श्रृंगी घुबड, बहिरी ससाणा (फाल्कन), शिक्रा, राखी धनेश, निळा माशीमार (ब्लू फ्लायकॅचर), काळ्या मानेचा करकोचा, कॉमन क्रेन, डोमिसेल क्रेन, सायबेरियन क्रेन, सारस क्रेन, कॉमन पोचार्ड (लहान लालसरी), दुर्मिळ युरेशियन स्पुनबिल या पक्षांचा समावेशही अनुसूची-१ मध्ये करण्यात आला आहे.

साळींदर थेट अव्वलस्थानी

यापूर्वी साळींदर (सायाळ) हा वन्यप्राणी अनुसूची-४ मध्ये होता. मात्र आता त्याचा समावेश अनुसूची-१मध्ये करण्यात आला आहे. यासह रानपिंगळा घुबडानंतर श्रृंगी घुबडालाही अनुसूची १ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. मुंगुसाच्या सर्व प्रजातींना अनुसूची-१मध्ये अव्वलस्थानी देण्यात आले आहे. यामुळे मुंगुसाची शिकार किंवा त्यास कैद केल्यास कारावासासह मोठा दंडदेखील भरावा लागणार आहे.