Nagpur : स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur School bus Accidentr

Nagpur : स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडले

नागपूर/कामठी : शहरालगतच्या म्हसाळा गावात मेरी सेंट पॉसपिंस अकॅडेमी शाळेसमोर स्कूल बसने दिलेल्या धडकेत १२ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सम्यक दिनेश कदंबे (वय १२) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.विद्यार्थ्यांनी आपल्याच शाळेसमोर हा मृत्यूचा थरार उघड्या डोळ्यांनी बघितला. त्यानंतर काही वेळाने त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची बातमी धडकताच इतर विद्यार्थी भीतीच्या सावटाखाली आहेत.

दुपारी २.३० वाजता शाळा सुटली. शाळेतील बहतांश विद्यार्थी स्कूल बस, स्कूल व्हॅनने ये-जा करतात. त्यामुळे शाळा सुटल्यावर सर्व विद्यार्थी मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर येत होते. तेवढ्यात शाळेची बस बाहेर आली आणि तिने महिला व पुरुषाला धडक दिली. चालकाला काही कळलेच नाही. त्याने सरळ बस दामटणे सुरू केले. समोर असलेल्या एका खासगी स्कूल व्हॅनला त्याने धडक दिली. काही अंतरापर्यंत व्हॅनला बसने रेटत नेले. दरम्यान रस्त्याच्या बाजूने दोन मुले पायी जात होती. बसने दोघांना धडक दिली.

स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडले

त्यांपैकी एक मुलगा बाजूला फेकला गेला आणि दुसरा मुलगा बसच्या खाली आला.

सम्यक दिनेश कदंबे (वय १२) या विद्यार्थ्याच्या डोक्यावरून बसचे चाक गेले, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. एक विद्यार्थी जखमी विद्यार्थ्याकडे धावला व त्याला पकडले. त्याच्या पाठोपाठ इतर विद्यार्थी आणि चालकही धावले. लगेच शाळा प्रशासनाचे कर्माचारीही तेथे पोहोचले. जखमी विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये नेले. आधी दोन खासगी रुग्णालयांत नेल्यानंतर अखेर त्याला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

‘ऑंखे खोल’ म्हणताच उघडले डोळे

ज्या विद्यार्थ्याने जखमी विद्यार्थ्याला सर्वप्रथम बघितले आणि उचलले, तो त्याच्याच व्हॅनमधील होता. ‘आम्ही त्याला उचलले, तेव्हा तो हालचाल करीत नव्हता. पण मी ‘आंखे खोल’, असे म्हटल्यावर त्याने डोळे उघडले होते. त्यामुळे त्याला काहीही होणार नाही, याची खात्री होती. पण सायंकाळी त्याच्या मृत्यूची बातमी धडकली. तेव्हा मदत करणारा विद्यार्थी अतिशय घाबरला होता. आपल्यासोबत व्हॅनमध्ये रोज शाळेत येणारा सम्यक आता आपल्यासोबत नसणार, ही कल्पनाच त्याला असह्य होत आहे.

एसटीचा निवृत्त कर्मचारी स्कूल बसचा चालक

ज्या स्कूल बसने विद्यार्थ्याला चिरडले, त्या बसचा चालक एस.टी. महामंडळाचा निवृत्त चालक असल्याची माहिती आहे. त्याचे वय ७० च्या जवळपास असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला महिला व पुरुषाला धडक दिल्यानंतर तो घाबरला असावा आणि नंतर त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले असावे, असा अंदाज व्हॅनच्या चालकाने व्यक्त केला.

व्हॅनमध्ये होती दोन मुले

महिला आणि एका पुरुषाला धडक दिल्यानंतर स्कूलबस ज्या व्हॅनला घासत पुढे गेली. त्या व्हॅनमध्ये दोन मुले होती. व्हॅनचालकाने लगेच सावध होत व्हॅनचे स्टेअरींग डाव्या बाजूला फिरवले आणि बसच्या तावडीतून व्हॅन बाजूला काढली. त्यानंतर बस विजेच्या खांबाला धडकली. तेव्हा कुठे मृत्यूचा थरार थांबला, असे चालकाने सांगितले.