राष्ट्रीय सभेच्या इतिहासात नागपूरचे अधिवेशन ठरले क्रांतिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur convention was revolutionary

राष्ट्रीय सभेच्या इतिहासात नागपूरचे अधिवेशन ठरले क्रांतिकारी

नागपूर : रौलेट ॲक्ट, जालियनवाला बाग हत्याकांडामुळे देशात प्रचंड असंतोष उफाळून आला होता. जनतेच्या भावना लक्षात घेऊन महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर १९२० मध्य नागपूर येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरविण्यात आले होते. चक्रवर्ती विजय राघावाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिवेशनात असहकार चळवळीच्या ठरावास मान्यता देण्यात आली. नागपूर अधिवेशनातूनच देशात असहकार चळवळीची दिशा ठरली. त्यामुळे नागपूरचे अधिवेशन राष्ट्रीय सभेच्या इतिहासात क्रांतिकारी ठरले होते.

१ ऑगस्ट १९२० च्या पहाटे लोकमान्य टिळक कालवश झाले. त्यांच्या मृत्यूचा दुखवटा व असहकाराच्या देशव्यापी आंदोलनाची सुरवात एकाच दिवशी झाल्याने भारतभर जनतेने हरताळ पाळून मिरवणुका काढल्या. सप्टेंबर १९२० च्या कोलकत्ता अधिवेशनात लाला लजपतराय यांच्या अध्यक्षतेखाली असहकार चळवळीचा आराखडा मांडून तो मंजूर केला. नागपूरच्या अधिवेशनात ठरावाला मान्यता मिळाली. या अधिवेशनात राष्ट्रीय सभेच्या ध्येय धोरणात बदल करणारी घटनादुरुस्ती संमत करण्यात आली.

महात्मा गांधींनी अशी घोषणा केली की, ‘असहकार चळवळ पूर्णत्वाने अमलात आणल्यास स्वराज्य एका वर्षात मिळवता येईल’. राष्ट्रीय सभेच्या इतिहासात नागपूर अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतिकारी ठरले. असहकार चळवळीत शाळा, महाविद्यालये, विधिमंडळ, न्यायालय, परदेशी माल यावर बहिष्कार टाकून स्वदेशीचा पुरस्कार करण्यात आला. १५ सदस्यांची काँग्रेस वर्किंग कमिटी स्थापन करण्यात आली व या कमिटीने काँग्रेसचे नेतृत्व करावे, असे ठरविण्यात आले.

गांधी युगाचा नागपुरातून प्रारंभ

देशाच्या आणि काँग्रेसच्या इतिहासात १९२० साली नागपुरात झालेले अधिवेशन ऐतिहासिक होते. येथूनच काँग्रेसची रचना बदलली, स्वराज्याचे ध्येय निश्चित झाले. असहकार आंदोलनावर शिक्कामोर्तब झाले. हे अधिवेशन २६ डिसेंबर १९२० पासून नागपुरातील काँग्रेसनगरमध्ये सुरू झाले होते. येथूनच गांधी युगाला प्रारंभ झाला.

झेंडा सत्याग्रहात नागपुरातील महिलांचा मोठा सहभाग

असहकाराच्या चळवळीत काही ठिकाणी झेंडा सत्याग्रह केला गेला. राष्ट्रीय सभेचा तिरंगा ध्वज जाहीरपणे फडकावणे असे या सत्याग्रहाचे स्वरूप होते. नागपूरमध्ये झेंडा सत्याग्रहात महिलांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेतला. त्यावेळी सर्व सत्याग्रहींना अटक झाली. यापासून स्फूर्ती घेऊन अनेक ठिकाणी तिरंगा ध्वज फडकावणे व ध्वजासह प्रभातफेऱ्या काढणे आदी कार्यक्रम पुढे हाती घेण्यात आले होते.