नागपुरातील सिद्धेश्वरनगरी वस्तीत पहिला भूकबळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

नागपुरातील सिद्धेश्वरनगरी वस्तीत पहिला भूकबळी

नागपूर : नियती क्रूर असते. कुणाची झोळी ओसंडून वाहेपर्यंत भरलेली. तर कुणाची शेवटपर्यंत रीतीच. नागपूरच्या सिद्धेश्वरनगरीतील गोंडवस्तीचेही आणि नियतीचे नाते यापेक्षा वेगळे नाही. येथील प्रत्येक झोपडीतील कर्त्या पुरुषाचा चऱ्हाट अन् हातात कुऱ्हाड घेऊन झाडे तोडण्याचा व्यवसाय. पोलिस पकडतात, जेलमध्ये रवानगी करतात, यामुळे हे काम सुटले. यांच्या हातातील काम गेले. या वस्तीवर उपासमारीचे संकट घोंघावत आले.

साठीतील रमेश प्रेमसिंग उईके महिनाभरापासून भुकेच्या वेदना सहन करीत होते. पोटातील भुकेच्या आगीत त्यांचा सारा देह होरपळून निघाला अन् आज त्याने देह ठेवला. सारी वस्ती हळहळली. ‘भूक प्यासने रमेश की जान ली’ असे ही वस्ती सांगत होती, त्यावेळी काळजात चर्रर्र झाले.

१८ कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्याची पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना असताना आणि या मोफत धान्यामुळे गरिबांवरचा ताण कमी झाला असे सांगण्यात येत असताना, नागपुरातील गोंड वस्तीतील सिद्धेश्वरनगरीत रमेशचा भूकबळी जातोच कसा?, असा सवाल विचारण्यात येत आहे. तीन दिवसांपासून भुकेने व्याकूळ झालेल्या रमेश उईकेंचे पोट पाठीला लागून गेले.पोटातील आतड्या चेपल्या होत्या. तहान लागल्यानंतर पाणीदेखील रमेशच्या पोटात जात नव्हते. अखेर सोमवार, १० ऑक्टोबरला रात्री रमेशचा भूकबळी गेला अन् त्याच्या पोटातील आग देह ठेवल्यानंतरच शमली.

दुःख वाटून घेण्याची तयारी

गोंड वस्ती तशी एकमेकांच्या दुःखात सहभागी होणारी, एकमेकांचे अश्रू वाटून घेणारी वस्ती. मात्र भूक कशी वाटून घेऊ, हा या वस्तीतील तरुणांचा सवाल. ‘साब, हमारे हातोंको काम दो, हमारे हात मेहनत करनेवाले है. दो सौ जवान लडके बस्तीमे है, लेकिन इनके हातो को काम नाही.’ आज रमेश भूकबळी ठरला. यानंतर आणखी किती भूकबळी द्यायचे, हा सवाल करीत तुफान उईके वस्तीत निघून गेला.

आदिवासी विभागाची बघ्याची भूमिका

गोंडवस्तीत सारे आदिवासी. त्यांच्या विकासाचा अजेंडा राबविण्यासाठी कोट्यवधींचे बजेट आहे. मात्र, आदिवासी विभागाचे अधिकारी त्यांच्यापर्यंत कधी पोचतच नाही. पोचले तरी फोटो काढून घेतात, सारे काही आलबेल असल्याचे सांगण्यात येते. वस्तीतील तरुणांच्या हाताला ना रोजगार मिळतो ना, महिलांचे बचत गट तयार होतात. आदिवासी विभाग केवळ बघ्याच्या भूमिकेत असल्याने सध्यातरी आदिवासींचा मुक्तिदिन कधी उगवेल, हे सांगता येणे शक्य नाही.

अंध पत्नी, कुटुंब उघड्यावर

रमेशची पंचावन्न वर्षांची पत्नी ‘तैमूल’ अंध आहे. मृत्यूनंतर तिच्यासह कुटुंबाला शेजाऱ्यांनी जेवण दिले. रमेशच्या लेकरांच्या हाताला काम नाही. जगायचे कसे, हाच सवाल या वस्तीतील माणसांचा आहे. कर्त्या पुरुषाच्या हाताला काम मिळत नसल्याने गोंडवस्तीत तीन-तीन दिवस अनेक घरी चूल पेटत नाही.

अंत्यसंस्कारासाठी वर्गणी

रमेशला भुकेची आग सहन झाली नाही अन् त्यांचा मृत्यू झाला. या मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाजवळ पैसेच नव्हते. बरमा, रामा, सचिन, दाऊ अन् लक्ष्मी सारी लेकरं वडिलांच्या निपचित पडलेल्या देहाकडे नुसतीच बघत होती. त्याचवेळी गोंड वस्तीतील सामाजिक कार्यकर्ते तुफान उईके यांनी साऱ्या वस्तीतील लोकांकडून वर्गणी गोळा गेली. एक दीड हजार रुपयांचा निधी गोळा झाला. यानंतर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.