
Nagpur : पेंचमध्ये पहिल्याच दिवशी वाघिणीसह बछड्याचे दर्शन
नागपूर - पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी प्रवेशद्वारातून सकाळच्या पहिल्याच जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना बखारी तलावाजवळील रेतीनाला परिसरात वाघ आणि वाघिणीचे बछड्यासह दर्शन झाले.
त्यामुळे पर्यटकांची पहिल्याच दिवसाची सफारी अविस्मरणीय ठरली. आल्हाददायक आणि निसर्गरम्य वातावरण वाघ, वाघिणीसह बछडे, गवा, सांबर, नीलगाय दिसल्याने तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही, असे एका पर्यटकाने सांगितले.
पावसाळी सुटीमुळे पेंच व्याघ्र प्रकल्प तब्बल तीन महिने बंद होता. नव्वद दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारपासून पेंच प्रकल्पातील गाभा क्षेत्रातील पर्यटन सुरू करण्यात आले. सकाळी पर्यटकांच्या हस्ते पूजा करून मुख्य दरवाजा उघडण्यात आला.
सकाळच्या सफारीत बखारी तलावाजवळील रेतीनाला परिसरात पहुडलेला वाघ (टी ५३) आणि आणि एका बछड्यासह वाघीण (टी ६७) दिसली. सायंकाळच्या सफारीत बखारी जवळच वाघ (टी६७) वाघ आणि बिबट्याने दर्शन दिले. खुर्सापार प्रवेशद्वारातून गेलेल्या पर्यटकांना हरीण, नीलगाय, गव्याचे दर्शन झाल्याची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही प्रवेशद्वारातून गेलेल्या पर्यटक आनंदले होते.
जंगलातील वातावरण अतिशय अल्हाददायक आणि शुद्ध असल्याने ताजेतवाने वाटत होते. पहिल्याच दिवशी पहिलीच सफारी करण्याची इच्छा होती ती पूर्ण झाली. गव्यांच्या कळपासह बिबट, हरीण, नीलगाय आणि इतरही प्राणी आणि पक्ष्यांचे दर्शन झाल्याने सफारी यशस्वी झाल्याचा हर्ष कौस्तुभ सोनी यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
पेंच प्रकल्पातील पहिलीच सफारी करायची निश्चित केले होते. त्यानुसार नियोजन केले आणि सकाळी जिप्सीत वन्यजीवापेक्षा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी प्रवेशद्वारातून प्रवेश केला. खापा परिसरातील बखारी जवळील तलावाजवळ वाघ नाल्यात बसलेला असल्याचे दिसले असे निसर्गप्रेमी पार्थ भगत यांनी सांगितले.
पहिल्याच दिवशी वाघ, बछड्यासह वाघीण व इतर वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्याने सुरुवात चांगली झालेली आहे. पर्यटन बंद असल्याने प्राण्यांच्या मुक्त वावर वाढला आहे. प्राण्यांची संख्याही झपाट्याने वाढलेली आहे. पावसाळ्यानंतर पर्यटनाचा श्रीगणेशा झाल्याने त्यावर अवलंबून असलेले गाइड, जिप्सी चालक, हॉटेल व्यवसायिकांना दिलासा मिळाला आहे.
- डॉ. प्रभूनाथ शुक्ला, प्रभारी क्षेत्र संचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प