esakal | Nagpur : सीबीएसई विद्यार्थ्यांनी नाकारले स्टेट बोर्ड!
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

Nagpur : सीबीएसई विद्यार्थ्यांनी नाकारले स्टेट बोर्ड!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अकरावी प्रवेशात सीबीएसई विद्यार्थ्यांचा बोलबाला दिसून येत असताना, यंदा सीबीएसई विद्यार्थ्यांनीच बोर्डाला नाकारल्याचे चित्र दिसून आले. त्याचा फटका विज्ञान व वाणिज्य अभ्यासक्रमातील प्रवेशाला बसला आहे. त्यातूनच मोठ्या प्रमाणात जागा रिक्त असल्याचे चित्र निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या माध्यमातून अकरावी प्रवेश देण्यात येत आहेत. त्यानुसार यामध्ये शहरातील राज्य मंडळाच्या अकरावी अभ्यासक्रमात प्रवेशासाठी सीबीएसई अभ्यासक्रमातील विद्यार्थी सहभागी होतात. दहावीत विभागातून १५ हजारावर विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झालेत. यापैकी किमान ५ ते ७ हजार विद्यार्थी दरवर्षी राज्य मंडळात प्रवेश घेतात.

त्यामुळे राज्य बोर्डाच्या तुलनेत गुणवत्ता यादीतही त्यांचे वर्चस्व दिसून येते. मात्र, गेल्या वर्षापासून सीबीएसई विद्यार्थी अकरावीसाठी सीबीएसई बोर्डाची निवड करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बऱ्याच नामवंत कनिष्ठ महाविद्यालयात रिक्त जागांचे प्रमाण वाढले आहे. कॅपमध्ये शहरातील २१७ कनिष्ठ महाविद्यालयातील ५८ हजार ८७५ जागांचा समावेश आहे. प्रवेशासाठी आतापर्यंत ३३ हजार ९४४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २९ हजार १८४ विद्यार्थ्यांनी ‘ऑप्शन फार्म' भरले आहेत.

दुसरी फेरी संपल्यावर १८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. त्यामुळे ४० हजारावर जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा विज्ञान शाखेच्या १७ हजार २१६ जागांचा समावेश आहे. सीबीएसई विद्यार्थी जवळपास विज्ञान शाखेतच अधिक प्रमाणात प्रवेश घेतात. मात्र, यंदा इतक्या प्रमाणात जागा रिक्त राहत असल्याने सीबीएसई विद्यार्थी यावर्षी राज्य बोर्डाकडे भटकलेच नसल्याचे दिसते. त्यातूनच यंदा मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहणार असल्याचेही चित्र आहे.

हेही वाचा: Nagpur : 'नीट'चा पेपर सोप्पा

नीट, जेईईसाठी फायदेशीर

सीबीएसईद्वारे तयार करण्यात येणारा अभ्यासक्रम एनसीआरटीईच्या माध्यमातून तयार केल्या जातो. यामुळे यामध्ये नीट आणि जेईईसारख्या परीक्षांसाठी असलेल्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष असल्याने त्यातून विद्यार्थ्यांचा बराच अभ्यासक्रम पूर्ण होतो. त्यामुळे सीबीएसई अभ्यासक्रम फायदेशिर असल्याने विद्यार्थीही राज्य मंडळाला नाकारत असल्याचे दिसून येते.

शाखा----------------जागा------प्रवेश-------रिक्त जागा

  1. कला - ९,४२० -- २,२५६-- ७,१६४

  2. वाणिज्य - १७,७२० -- ५,०८३ -- १२,६३७

  3. विज्ञान - २७,७२० -- १०,५०४ -- १७,२१६

  4. एमसीव्हीसी - ४,०१५ -- १,००३ -- ३,०१२

loading image
go to top