Nagpur Stray Dog Attack : दररोज २३ नागरिकांना कुत्र्यांचा चावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur stray dogs

Nagpur Stray Dog Attack : दररोज २३ नागरिकांना कुत्र्यांचा चावा

नागपूर : नसबंदी शस्त्रक्रिया बंद असल्याने शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या एका लाखापेक्षा जास्त झाली आहे. नागरिकांवरील हल्ले वाढत असून दररोज सरासरी २३ नागरिकांना कुत्री चावत आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत ४ हजार ७२३ नागरिकांना जखमी केल्याचे आकडेवारीतून समोर आले झाले. त्यामुळे मोकाट कुत्र्यांवर कधी नियंत्रण येईल, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.

कोविडमुळे श्वानांची नसबंदी शस्त्रक्रिया बंद झाली, ती आजपर्यंत बंद आहे. परिणामी शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या लाखावर गेली असून रस्ता, वस्तीत त्यांचे कळप तयार झाले आहे. त्यातच अनेक श्वान हिंसक झाले असून त्यांनी चावा घेणेही सुरू केले आहे. गेल्या सात महिन्यांत ४ हजार ७२३ नागरिकांना श्वानांनी चावा घेतल्याचे महापालिकेने माहिती अधिकारात आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांना दिलेल्या माहितीतून अधोरेखित झाले. अर्थात दर महिन्याला पावणे सातशे नागरिकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केले.

एकूणच मोकाट कुत्र्यांची दहशत शहरात कायम असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येकच वस्तीत नागरिकांना कुत्र्यांमुळे आपला रस्ता बदलावा लागत आहे. मागील वर्षी स्वावलंबीनगरातील नऊ वर्षीय मुलाला मोकाट श्वानाने चावा घेतल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. अशा अनेक घटना घडल्याने पालकही शाळेत मुलाला सोडताना चिंतेत दिसून येतात. शहरातील बहुतेक भागात मोकाट कुत्र्यांची दहशत असून महापालिकाही केवळ नसबंदीचाच पर्याय पुढे करीत आहे. नसबंदी शस्त्रक्रियेसाठी अद्यापही राज्य सरकारकडून निधी न मिळाल्याने महापालिकाही लाचार दिसून येत आहे.

सात वर्षात ५८ हजार नागरिकांना चावा

२०१६-१७ ते ऑक्टोबर २०२२, या सात वर्षात मोकाट कुत्र्यांनी ५८ हजार २४ नागरिकांना चावा घेतला. २०१६-१७ मध्ये ९ हजार ९३०, २०१७-१८ मध्ये ९ हजार ८६०, २०१८-१९ मध्ये ११ हजार ६३३, २०१९-२० मध्ये १२ हजार ४८८, २०२०-२१ मध्ये २ हजार ५८४, २०२१-२२ मध्ये ६ हजार ८०६ व चालू वर्षात एप्रिल ते ऑक्टोबरपर्यंत ४ हजार ७२३ लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला.

अशी वाढली मोकाट श्वानांची संख्या

शहरात २०२० पर्यंत ८१ हजारांवर मोकाट कुत्री होती. ५९ हजार श्वान नसबंदीशिवाय होते. यात २५ हजाराच्या जवळपास मादी श्वान आहेत. वर्षभरात एक मादी श्वान दोनदा पिलांना जन्म देते. एकावेळी एक मादी चार ते पाच पिलांना जन्म देत असली तरी यातील दोनच जिवंत राहतात, असे एका अधिकाऱ्याने नमुद केले. त्यामुळे पिलांना जन्म न देणाऱ्या दहा हजार मादी श्वानांचा अपवाद वगळला तर १५ हजार मादींनी वर्षभरात ६० हजार पिलांना जन्म देण्याची शक्यता एका खासगी शस्त्रक्रिया करणाऱ्या संस्थेच्या प्रतिनिधीने व्यक्त केली.

शस्त्रक्रियेवर तीन वर्षात ९४ लाख खर्च

कोरोना काळापासून शस्त्रक्रिया बंद असली तरी त्यापूर्वी २०१७-१८, २०१९-२०, २०२०-२१ या तीन वर्षात शस्त्रक्रियेवर महापालिकेने ९४ लाख ४ हजार ५४४ रुपये खर्च केले. २०१८-१९ या वर्षांत शस्त्रक्रिया बंद होत्या. ९४ लाख रुपये खर्च करूनही शहरात दरवर्षी श्वानांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या शस्त्रक्रिया यशस्वी होतात की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळात श्वानांच्या चावा घेण्यावरही नियंत्रण आले होते.