
Nagpur : शंभराच्या वर्षात मिळणार विद्यापीठाच्या धावपटूंना 'गिफ्ट'
नागपूर : यंदा १०० वा वर्धापनदिन साजरा करीत असलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मैदानावरील अद्ययावत सिंथेटिक ट्रॅकचे काम अंतिम टप्प्यात असून, येत्या महिनाभरात उर्वरित बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच ट्रॅकचे उदघाटन विद्यापीठाच्या धावपटूंना सरावासाठी स्वतःचा व हक्काचा ट्रॅक मिळणार आहे.
या ट्रॅकचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले असून, केवळ सिंथेटिक सरफेस व मार्किंगचे काम शिल्लक आहे. हे काम या महिन्याअखेरपर्यंत पूर्ण होऊन लवकरच उद्घाटनचा बार उडून सरावासाठी ट्रॅक खुला करून दिला जाणार आहे. विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलेशियन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बेस असपालटिंगचे काम नुकतेच पूर्ण झाले.
येत्या १५ फेब्रुवारीपासून सरफेस टाकण्याचे काम सुरू होत आहे. १५ दिवस सरफेसिंगचे काम चालल्यानंतर विदेशी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मार्किंग होणार आहे. या दोन्ही कामांना जवळपास एक महिना लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर मार्चमध्ये थाटात उद्घाटन केल्या जाईल. कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी व अन्य अधिकाऱ्यांनी नुकताच ट्रॅकच्या बांधकामाचा आढावा घेतला असून,
कामावर समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या स्थापनेच्या १०० व्या वर्षात धावपटूंना ही ऐतिहासिक व अविस्मरणीय गिफ्ट मिळत असल्याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. १०.६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेला हा ट्रॅक आठ लेन्सचा असून, मैदानाच्या चारही बाजूंनी फ्लडलाईट्सची व्यवस्था राहणार आहे. एकूणच ट्रॅक परिसरात धावपटूंसाठी आवश्यक सर्व सोयीसुविधा राहणार आहेत.
राज्य स्पर्धेने सुरुवात
मार्च अखेरीस या ट्रॅकचे उद्घाटन व्हावे अशी विचार असला तरी एखाद्या स्पर्धेने या ट्रॅकचे उद्घाटन व्हावे असा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहे. डॉ. शरद सूर्यवंशी हे राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे वरिष्ठ सहसचिव असल्याने एप्रिल अखेरीस किंवा मे महिन्याच्या सुरुवातीला होणारी सिनिअर राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेऊन उद्घाटन करावे असा प्रयत्न आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा व आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी जून महिन्यात होणारी राष्ट्रीय स्पर्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे यंदा राज्य स्पर्धेला विशेष महत्त्व आहे व ही स्पर्धा नागपुरात नवीन सिंथेटिक ट्रॅकवर व्हावी यासाठी प्रयत्न आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा सिंथेटिक ट्रॅक नागपूर विद्यापीठासाठी अभिमानाची गोष्ट आहे. उल्लेखनीय म्हणजे, विद्यापीठाच्या स्थापनेच्या १०० व्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण होत आहे. विद्यापीठासह नागपूरच्या शेकडो युवा धावपटूंना हे अनोखे गिफ्ट ठरणार आहे.
-डॉ. शरद सूर्यवंशी (संचालक, शारीरिक शिक्षण विभाग, नागपूर विद्यापीठ)