esakal | नागपूर : कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी ‘टाटा’ची मदत
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी ‘टाटा’ची मदत

नागपूर : कॅन्सर इन्स्टिट्यूटसाठी ‘टाटा’ची मदत

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Govt. Medical College) व रुग्णालयात (मेडिकल) २०१२ पासून प्रस्तावित असलेल्या कॅन्सर इन्स्टिट्यूटचा (Cancer Institute) घोळ अद्यापही सुटला नाही. मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात ही संस्था उभारण्यासाठी आता टाटा कॅन्सर रुग्णालयातील डॉ. कैलाश शर्मा यांची मदत घेण्याची सूचना वैद्यकीय सचिव सौरभ विजय यांनी गुरुवारी (ता.२) झालेल्या ऑनलाइन बैठकीतून केली. ७६ कोटीतून कॅन्सर इन्स्टिट्यूट मेडिकलच्या टीबी वॉर्ड परिसरात आकाराला येणार आहे.

प्रस्तावित जागा मेडिकलच्या नावावर करण्यासाठी नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधीकरण आणि अधिष्ठात्यांनी समन्वयातून मार्ग काढावा अशीही सूचना केली आहे. संस्थेच्या उभारणीची जागा बदलल्याने नव्याने हा घोळ संस्थांच्या तत्कालीन अधिष्ठातांमुळे झाला आहे. ऑनलाइन बैठकीला मुंबई, नागपूरसह विविध भागातून वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, शल्यक्रिया विभागाचे प्रमुख आणि प्रभारी अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, रेडिओथेरपी विभागप्रमुख डॉ. अशोक दिवाण तसेच टाटा संस्थेचे डॉ. कैलाश शर्मा यांच्यासह नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधीकरणसह (एनएमआरडीए) इतरही काही विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा: पोलिसांना मिळावी वेतनाच्या फरकाची रक्कम

वैद्यकीय सचिवांनी मेडिकलचा हा प्रकल्प नऊ वर्षांपासून रखडल्याचे सांगत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडनणींमुळे ही जागा मेडिकलच्या नावावर नसल्याने उत्तर दिले. मात्र सचिवांनी यापुढे अधिष्ठाता आणि आर्किटेक्ट यांनी समन्वयातून हा प्रश्न सोडविण्याची सूचना केली. औरंगाबाद येथे कॅन्सर इन्स्टिट्यूट उभारण्यासाठी टाटा संस्थेची मदत घेण्यात आली होती. नागपूरच्या प्रकल्पासाठीही प्रथम टाटाच्या डॉ. कैलाश शर्मा यांनी जागेची पाहणी केली होती. परंतु, त्यानंतर ‘टाटा’शी संपर्क करण्यात आला नाही. ही नाराजी यावेळी सचिवांनी दर्शवली. कॅन्सर इन्स्टिट्यूटबाबत ‘टाटा’चा अनुभव मोठा आहे. या प्रकल्पाला गती देण्याची सूचना केली गेली. ‘टाटा’ संस्थेचे डॉ. कैलाश शर्मा यांनीही या प्रकल्पासाठी त्यांच्याकडून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.

प्रशासनाकडून चालढकल

मेडिकलच्या स्थानिक प्रशासनाकडून जागा नावावर करण्यासाठी पाठपुरावा योग्य तऱ्हेने होत नसल्यानेच आतापर्यंत हा प्रकल्प रखडला असल्याचे थेट बोल सचिवांनी यावेळी सुनावले असल्याचे चर्चेतून पुढे आले. प्रशासनाने चालढकल न करता जागा त्वरित नावावर करण्यासाठी योग्य तो मार्ग काढावा अशी सूचना केली.

loading image
go to top