नागपूर : तीन ‘स्वाईन फ्लू’ संशयितांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Swine-Flu

नागपूर : तीन ‘स्वाईन फ्लू’ संशयितांचा मृत्यू

नागपूर - शहरात कोरोना,डेंगीसह स्वाइन फ्लूमुळे दहशत पसरली आहे. त्यातच तीन ‘स्वाईन फ्लू’ संशयितांचा येथील विविध रुग्णालयात मृत्यू झाला. यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले असून हे मृत्यू स्वाइन फ्लूचे आहेत किंवा नाही, याची शहानिशा करण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयात मृत्यू विश्‍लेषण समितीची बैठक होणार आहे. यानंतरच नागपुरातील स्वाइन फ्लू बाधितांच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब होईल. विशेष असे की, दै. सकाळने स्वाइन फ्लू वाढत असतानाही ‘ना लस, ना स्वाइन फ्लू वॉर्ड’ या आशयाची बातमी प्रकाशित करताच मेडिकलमध्ये स्वाइन फ्लू वॉर्ड तयार करण्यात आला आहे.

उपराजधानीत स्वाईन फ्लचा संसर्ग वाढला आहे. पुर्व विदर्भातील नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये सुमारे ६७ स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले आहेत. तर ३ स्वाइन फ्लू संशयितांचा मृत्यू झाला असून यात एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. मात्र हे स्वाइन फ्लूचे मृत्यू आहेत किंवा नाही, यासाठी डेथ ऑडिट कमेटीची (मृत्यू विश्लेषण समिती) बैठक गुरुवारी आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वैद्यकीय तज्ज्ञ तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय तज्ज्ञ मृत्यू विश्‍लेशन समितीमध्ये मृतकांच्या केस पेपरवरून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यात येईल. माता व बालमृत्यूसंदर्भात या समितीची बैठक दर महिन्याला होत असते. मात्र संशयित डेंगी किंवा स्वाइन फ्लुने झालेल्या मृत्यूवर शिक्कामोर्तब समितीमध्ये चर्चा झाल्यानंतरच केली जात असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

‘स्वाईन फ्लू’ वॉर्ड तयार

मेडिकल वार्ड क्रमांक ४९ मध्ये ३२ खाटा आहेत. या खाटांपैकी प्रत्येकी ८ खाटांचा एक असे एकूण चार भाग येथे आहेत. पहिल्या टप्प्यात ८ खाटांचा एक स्वतंत्र स्वाइन फ्लू वॉर्ड तयार करण्याचे निश्चित झाले. मात्र या वॉर्डात इतर आजाराचे रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती आहे. तर वॉर्ड ४९ तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असताना मेडिकलमध्ये दोन स्वाइन फ्लू बाधित रुग्णांना दाखल करण्यात आले. यामुळे एक नवे संकट पुढे आले. यावर तात्पुरती मलमपट्टी म्हणून या स्वाइन फ्लू बाधितांना मेडिकलच्या वार्ड क्रमांक १३ मध्ये वेगळ्या कप्प्यात ठेवण्यात आले असल्याची माहिती पुढे आली. दरम्यान वॉर्ड ४९ मध्ये ऑक्सिजन कमी दाबाने पुरवठा होण्याचा नवा पेच पुढे आला आहे. मात्र अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता यांनी या प्रकरणात वैद्यकीय अधिक्षक डॉ. अतुल राजकोंडावार यांनी येथे एनआयव्ही ऑक्सिजन पुरवठा शक्य असल्याचा दावा केला.

Web Title: Nagpur Three Swine Flu Suspects Death Health Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..