Nagpur : वाघांच्या ५ किलो हाडांसह दोघे ताब्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur

Nagpur : वाघांच्या ५ किलो हाडांसह दोघे ताब्यात

उमरेड : वाघांच्या अवयवांची तस्करी करताना नागपूर आणि भंडारा वनविभागांच्या संयुक्त कारवाईत दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून १० दातांच्या जोडीसह १५ किलो वाघांची हाडे जप्त केली. भंडारा जिल्ह्‍यातील गोबरवाही येथे ही कारवाई करण्यात आली. या घटनेने मात्र, वाघांच्या अवयवांची तस्करी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येते.

गेल्या काही महिन्यांपासून वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करीचे प्रमाण वाढले आहे. विदर्भात वाघांची संख्या अधिक असल्याने आंतरराज्यीय शिकारी आणि तस्कर शिकारीसाठी ठाण मांडून बसल्याचे दिसून येते. वन विभागाच्या पथकाने आतापर्यंत बरेच छापे घालून तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही परिसरात वाघांच्या अवयवांची तस्करी होत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

आज, बनावट ग्राहक तयार करून वाघांची अवयव विकत घेण्यासाठी पाठविण्यात आले. गेल्या दोन दिवासांपासून लावलेल्या सापळ्यात दोन तस्कर सापडले. संजय श्रीराम पुस्तोडे, (वय ४१) रा. चिखला माईन्स,रामू जयदेव उईके,(वय ३३) रा. असलपणी यांना रंगेहात अटक केली. त्यांच्याकडून १५ नग वाघनखे, १० दात जोडी, अंदाजे ५ किलो हाडे जप्त केली. तसेच त्यांचे दुचाकी वाहन ताब्यात घेतले. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमाद्वारे त्यांच्यावर वनगुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मुख्य वनसंरक्षक नागपूर वन वृत्त नागपूर रंगनाथ नाईकडे, उपवसंरक्षक डॉ.भारत सिंह हाडा, उपवसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात वन अधिकारी दक्षता पी. जी. कोडापे,उमरेडचे सहायक वनसंरक्षक नरेंद्र चांदेवार, सहायक वनसंरक्षक संदीप गिरी,सहायक वनसंरक्षक साकेत शेंडे, वन परिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे, वनपरिक्षेत्र अधिकारी पी. एम. वाडे, वनरक्षक श्री. तावले, श्री. पडवळ, श्री. जाधव, श्री. शेंडे यांनी सापळा रचून कारवाई केली. पुढील तपास सहायक वनसंरक्षक साकेत शेंडे हे करीत आहेत.

१० वाघांच्या शिकारीचा संशय?

वन विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत १० दात जोडी जप्त करण्यात आली. यामुळे १० वाघांची शिकार केली काय?, असा संशय निर्माण होत आहे. या दहा वाघांची शिकार कोणत्या वनपरिक्षेत्रातून केली, असा प्रश्न निर्माण होत असून यात आंतरराज्यीय तस्करांचा समावेश असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Nagpurcrimeanimal