नागपूर : कारच्या अपघातात दोन तरुणी ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

नागपूर : कारच्या अपघातात दोन तरुणी ठार

नागपूर : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने कार घराच्या कम्पाऊंडवॉलमध्ये घुसली. त्या अपघातात दोन तरुणी जागीच ठार झाल्या तर दोन युवक गंभीर जखमी झालेत. जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे. हा अपघात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झाला. भावना मोहनलाल यादव (१८, सतरंजीपुरा) आणि राशी दीपक पटेल (२२, ईतवारी) अशी दोन्ही ठार झालेल्या तरुणींची नावे आहेत. कारचालक चिराग राजेश जैन (२१, सतरंजीपुरा) आणि त्याचा मित्र गिरीश लक्ष्मण रामचंदानी (२१) अशी गंभीर जखमींची नावे आहेत.

हेही वाचा: Nagpur : मोकळ्या भूखंडधारकांवर अजूनही कारवाई नाहीच

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भावना, राशी आणि आरोपी चिराग आणि गिरीश हे मित्र होते. रविवारी रात्री आठच्या सुमारास चौघे चिरागच्या (एमएच ३१ ईवाय ८८९९) क्रमांकाच्या बोलेरो कारने वाडी येथील अ‍ॅटमऑस्फिअर हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर रात्री १०.१० वाजताच्या सुमारास चौघेही घरी येण्यास निघाले. चिराग कार चालवित होता तर त्याच्या बाजूला गिरीश बसला होता. दोन्ही तरुणी मागील सिटवर बसल्या होत्या. चिराग हा वेगात कार चालवित होता. भरतनगर येथील पंजाब नॅशनल बँकेजवळून येत असताना चिरागचा भरधाव कारवरील ताबा सुटला आणि कार फुटपाथवर चढून बाजूला असलेल्या झाडाला धडक दिली. त्यानंतर कार बाजूलाच असलेल्या घराच्या कंपाउंड वॉलला धडक देऊन कार उलटली. या घटनेची माहिती अंबाझरी पोलिसांना समजताच ठाणेदार अशोक बागुल हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. गंभीर अवस्थेत पोलिसांनी दोघींनाही खासगी रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी दोन्ही तरुणींना मृत घोषित केले.

हेही वाचा: अल्पवयीन मुलीसोबत संमतीने शरीरसंबंध ठेवणे बलात्कारच - HC

चिराग गेला पळून

अपघातानंतर गिरीश हा घटनास्थळीच जखमी अवस्थेत बसला तर कारचालक चिराग जैन हा पळून गेला. गिरीशने त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांना दिला. पोलिसांनी चिरागसोबत संपर्क साधून त्याला घटनास्थळी येण्यास सांगितले. परंतु तो न आल्याने त्याचे लोकेशन घेऊन सेंट्रल अव्हेन्यू चौकातून चिरागला ताब्यात घेतले. याप्रकरणी अंबाझरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून चिराग यास अटक केली.

एअर बॅगने वाचवला जीव

भरधाव कार झाडावर आदळताच वेळीच एअरबॅग उघडल्याने चिराग आणि गिरीशचा जीव वाचला. चौघेही जखमी झाले होते. जखमी राशी आणि भावना गंभीर जखमी अवस्थेत मदतीसाठी आरडाओरड करीत होत्या. परंतु अपघातस्थळावर वेळीच पोलिस किंवा नागरिकांची मदत न मिळाल्याने दोन्ही युवतींचा जागीच जीव गेला.

Web Title: Nagpur Two Young Women Killed In Car Accident

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..