Shivsena News : बाप तर चोरलाच; फोटोही चोरताहेत ; उद्धव ठाकरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News, Uddhav Thackeray News

Shivsena News: बाप तर चोरलाच; फोटोही चोरताहेत ; उद्धव ठाकरे

नागपूर : हिवाळी अधिवेशनात भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि महापुरुषांचा होणारा अवमान, यावरून हे अधिवेशन चांगलंच तापले आहे. विरोधी पक्षाने विविध मुद्दे उपस्थित करून सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळात खडाजंगी सुरू असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपुरातून शिंदे गटावर जोरदार टोलेबाजी केली.(Shivsena News)

शिंदे गट मागील काही दिवसांपासून बाळासाहेब ठाकरेंना चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. आता ते मी काढलेले फोटोही चोरत आहेत. त्यांना फोटो काढण्याची पण अक्कल नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली. नागपुरात आयोजित केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे विधान केले.

शिवसैनिकांना संबोधित करताना शिंदे गटाला उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्यांची स्वत: काही कमावण्याची लायकी नसते, ते सगळे काही चोरतात. ते शिवसैनिकांच्या मेहनतीवर निवडून आले, आता ते पलीकडे गेले आहेत. जाताना त्यांनी माझे वडील, पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चोरण्याचा प्रयत्न केला. पण ते माझी हिंमत चोरू शकत नाही. हिंमत अंगात असावी लागते. त्यांनी काय केलंय? हे त्यांना आता कळणार नाही. पण ते जेव्हा सामन्याला समोर येतील, तेव्हा मी त्यांना दाखवून देईन…”

नागपुरात येताना सोमवारी रस्त्यावर काही पोस्टर लावल्याचे पाहत होतो. दोन्ही पोस्टरवर बाळासाहेबांचा फोटो होता. त्यामुळे आपले कोणते आणि तोतये कोणते? हेच कळत नव्हते. त्यांच्याकडून बाळासाहेबांना चोरायचा प्रयत्न सुरू आहेच. पण ते आता मी काढलेले फोटोही चोरत आहेत. म्हणजे त्यांना फोटो काढण्याची पण अक्कल नाही आणि निघाले मोठे राज्य करायला. असे बुडबुडे जास्त काळ टिकत नाहीत.

त्यांना आपण टाचणी लावूच. पण भाजप त्यांना टाचणी लावणार नाही ना? हा प्रश्न आहे. कारण ज्याप्रकारे त्यांची (शिंदे गट) भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर येत आहेत. बरोबर त्याच मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर कशी येत आहेत? हा विचार त्यांनी करायला पाहिजे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.