
नागपूर | 5 पुरुष आणि एका महिलेचा जागीच मृत्यू, उमरेडमध्ये भीषण अपघात
नागपूर : उमरेड येथून प्रवाशांना घेऊन येणाऱ्या भरधाव चारचाकीने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या ट्रकला धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की चारचाकीतील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक व्यक्ती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री 10.30 वाजता उमरेड मार्गावरील मौजा उमरगाव राम कुलर कंपनीजवळ ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये 5 पुरूष व एका महिलेचा समावेश आहे. (Nagpur Accident News)
सागर शेंडे रा. पिवळी नदीजवळ, उप्पलवाडी (टवेराचालक), मेघा आशिष भुजाडे रा. नझूल ले-आउट बेझनबाग, देविदास गेडाम, नरेश डोंगरे रा. भीमचौक, इंदोरा अशी मृतांची नावे असून उर्वरितांची नावे कळू शकली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, चालक सागर शेंडे हा एमएच 31- सी 4315 क्रामांकाची टवेरातून प्रवासी घेऊन नागपूरकडे परतत होता. रात्रीची वेळ असल्याने चालकाने टवेराचा वेग फारच वाढविला होता. एमएच 40- बीजी 7757 क्रमांकाचा टिप्पर रस्त्याच्या कडेला उभा होता. ही बाब जीपचालकाच्या वेळीस नजरेस पडली नाही.
टिप्पर उभे असल्याचे लक्षात येताच चालकाने करकचून ब्रेक लावला. मात्र वेग फार अधिक असल्याने जीप अनियंत्रित होऊन टिप्परवर धडकली. अपघातग्रस्त टवेरा टिप्परच्या आतच अडकून पडली. उपघाताचा आवाज आणि प्रवाशांच्या किंचाळ्या ऐकून या मार्गाने जाणारे थांबून अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी धावले. काहीजण आतच अडकून पडले होते. कसेबसे टवेराला मागे काढल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. आत रक्ताचा सडा सांडल्याचे दृष्य होते. चालकासह पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता.
घटनेची माहिती मिळताच हुडकेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पाचगाव पोलिस चौकीतील कर्मचारीही मदतीसाठी धावले. जखमींना मिळेल त्या वाहनाने तातडीने उपचारासाठी नागपूरकडे रवाना करण्यात आले. दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर मेडिकलमध्ये उपचार सुरू असल्याचे सांगितले जाते. रात्री उशीरापर्यंत घटनेबाबत पुरेशी माहिती मिळू शकली नव्हती. घटनेनंतर उमरेड मार्गावर वाहतूक खोळंबली होती. उमरेड पोलिसांनी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मृतक व जखमीच्या कुटुंबीयांनी मेडिकलमध्ये धाव घेतली.
चिमुकला सुखरूप
मिळालेल्या माहितीनुसार, टवेरात एकूण आठजण होते. त्यात एका चिमुकल्याचाही समावेश होता. धडक एवढी भीषण असतानाही या चिमुकल्याला साधे खरचटलेही नाही. म्हणूनच म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी..
Web Title: Nagpur Umred Road Tipper Tavera Accident Six Killed One Injured
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..