Nagpur University : विद्यापीठात चक्क दिल्या धमक्या? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tukdoji Maharaj Nagpur University Election

Nagpur University : विद्यापीठात चक्क दिल्या धमक्या?

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अधिसभा, विद्या परिषद आणि अभ्यास मंडळ प्राधिकारिणीच्या निवडणुकीत रविवारी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या चारही जिल्ह्यांमध्ये ८५ केंद्रावर मतदान सुरक्षित व शांतपणे पार पडल्याचा दावा केला जात असला तरी शहरातील काही केंद्रांवर मतदानासाठी चक्क धमक्यांचा धाक देण्यात आल्याचा आरोप काही संघटनांनी केला आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ८३.६१ टक्के मतदान झाले. उद्या, मंगळवारी (ता.२२) रोजी मतमोजणी होणार आहे.

विद्यापीठ अधिसभेवर निवडून द्यावयाच्या दहा प्राचार्य मतदारसंघामध्ये १० जागेसाठी विविध संवर्गातील १५, व्यवस्थापन परिषद मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील सहा जागांसाठी १०, महाविद्यालयीन शिक्षक मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील १० जागेसाठी २१, विद्यापीठ शिक्षक मतदारसंघामध्ये विविध संवर्गातील तीन जागांसाठी आठ उमेदवार उभे होते. विद्या परिषदेवर निवडून द्यावयाच्या विविध विद्याशाखेतूनही उमेदवार उभे होते. अभ्यास मंडळावर निवडून द्यावयाच्या विद्याशाखानिहाय प्रत्येकी तीन विभागप्रमुख निवडून द्यावयाचे असून विविध विद्याशाखेतील अनेक उमेदवार उभे होते. २२ नोव्हेंबरला विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय इमारतीमध्ये होणार आहे.

३२ अभ्यासमंडळाच्या ९५ जागांवर अविरोध

एकूण ७२ अभ्यास मंडळ (बोर्ड ऑफ स्टडीज)पैकी ३२ अभ्यासमंडळाच्या ९६ जागांवर शिक्षण मंचाचे उमेदवार अविरोध विजयी झाल्याचा दावा केला आहे. या अविरोध निर्वाचितांमध्ये व्हीजेएनटी प्रवर्गातील डीएनसीचे प्राचार्य डॉ. कडते यांचा समावेश आहे. प्रत्येक अभ्यासमंडळासाठी तीन उमेदवार निश्चित करण्यात आले.

मतदारांची संख्या

विविध प्राधिकारिणीसाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये महाविद्यालयीन शिक्षक ४५४८, व्यवस्थापनाचे प्रतिनिधी -२१२ , प्राचार्य -१५३, विद्यापीठ शिक्षक -१४१, विद्या परिषद अभ्यास मंडळामध्ये सर्व विद्याशाखेमध्ये - ४६८१ मतदारांची संख्या होती.

असा आहे आरोप

मतदानादरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार आहे. रायसोनी येथील मतदान केंद्रावर नुटा संघटनेचे काही प्रतिनिधी उभे असताना केंद्रावरील एका प्राचार्यांनी त्यांना उभे राहण्यास अडवले. मात्र, इतर संघटनेच्या लोकांना उभे राहू दिले जात असल्याची तक्रार आहे. दुसरीकडे मतदारांना एका खोलीत नेऊन डमी मतदान पत्रिका वाटप करून कुणाला मतदान करायचे हे सांगितले जात असल्याची तक्रार नुटाने केली आहे. शिवाय त्यांनाच मतदान न केल्यास नोकरीत समस्या निर्माण करण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही केला जात आहे.