नागपूर : परीक्षेचा मुहूर्त ठरला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur University exams declared to 8th June

नागपूर : परीक्षेचा मुहूर्त ठरला

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेचा मुहूर्त निघाला असून ८ जूनपासून विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाचे ठरले आहे. पहिल्या टप्प्यात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा होणार आहे. मात्र, परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन पद्धतीने होणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे.

विद्यापीठाद्वारे यापूर्वी परीक्षा मंडळाच्या बैठकीत ऑनलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार विद्यापीठाने तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी कुलगुरूंच्या बैठकीत, ऑफलाइनचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाने लवकरात लवकर परीक्षेबाबत निर्णय घेणे अपेक्षित होते. मात्र, याला वीस दिवसांपेक्षा जास्तीचा कालावधी उलटून गेल्यावरही विद्यापीठाकडून कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही.

आज विद्यापीठात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी बैठक घेतली. त्यामध्ये ९ जूनपासून परीक्षा घेण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये ८ जून पासून पदवी अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि १५ जूनपासून सर्वच पदव्युत्तर अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाच्या परीक्षा, २२ जून पासून सर्वच अभ्यासक्रमातील सम सत्रांच्या परीक्षांचा समावेश करण्यात येणार आहे. अद्याप कोणत्या मोडवर परीक्षा घेण्यात येणार आहे, याबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थी अद्यापही संभ्रमात सापडले आहे.

परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णयाची अपेक्षा

विद्यापीठाच्या परीक्षेबाबत परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे मंडळाचे संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी दिली. यापूर्वी ऑनलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा याच प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय घ्यावा लागणार आहे.

अशा आहेत तारखा

  • ८ जून पदवी अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा

  • १५ जून पदव्युत्तर अभ्यासक्रम अंतिम वर्ष परीक्षा

  • २२ जून सर्व अभ्यासक्रमातील सम सत्राच्या परीक्षा