
Nagpur : बजरंगबलीच्या मंदिर रक्षणासाठी काँग्रेसने ठोकला शड्डू, नगरपरिषदेसमोर कार्यकर्त्यांचं हनुमान चालीसा पठण
हिंगणा : वानाडोंगरी नगरपरिषदेकडून मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवितांना बसस्थानकासमोर असलेले हनुमान मंदिर हटविण्यात आले. याचा निषेध व्यक्त करण्यासाठी व त्याच ठिकाणी मंदिर बांधकाम करून द्यावे, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने आज ( ता.३१) नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी नगरपरिषद समोर हनुमान चालीसा पठण केले.
कुठलाही आदेश नसताना नगर परिषद वानाडोंगरीतील सत्ताधारी पक्षाने ठराव घेऊन ११ मे रोजी अतिक्रमण हटविताना वानाडोंगरी बसस्थानक समोरच्या हनुमान मंदिराला पाडण्यात आले. यामुळे संतप्त नागरिकांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितेश भारती ,माजी उपसरपंच नवसु गवते, माजी उपसरपंच राजा तिवारी, ग्रामपंचायत सदस्य संजय हुरपाटे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. सत्ताधारी भाजप व प्रशासनाविरोधात नारेबाजी करीत कार्यालयाच्या गेटसमोर हनुमान चालीसा पठण केले. यावेळी हनुमान व रामलक्ष्मण यांची वेशभूषा करून मुलं सहभागी झाले होते.
यानंतर मोर्चातील प्रतिनिधीनी मुख्याधिकारी नंदनवार यांची भेट घेतली.आधी असलेल्या ठिकाणी मूर्ती बसविण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन दिले.यावर मुख्याधिकाऱ्यांनी सदर निवेदन सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येईल, त्यावर आलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तत्काळ निर्णय न घेतल्यास तीव्र असा इशारा भारती यांनी दिला आहे.
मोर्च्यात काँग्रेसचे प्रदेश सचिव अश्विन बैस, जिल्हा उपाध्यक्ष आशीष मंडपे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, अखंड भारत विचार मंच, छत्रपती सेना, युवा कांग्रेस, महिला काँग्रेस, स्वराज्य सेना, अखंड भारत विचारमंच, शिवबा जनशक्ती फाउंडेशन आदी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.