नागपूर : तापमान वाढताच पाणीचोरीतही वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur water scarcity temperature rise water theft increases

नागपूर : तापमान वाढताच पाणीचोरीतही वाढ

नागपूर : शहराचे तापमान शनिवारी ४५.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून उकाड्यात सातत्याने वाढ होत असल्याने कुलरमध्ये पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे काही नागरिकांनी थेट टुल्लू पंपाचा वापर करून इतरांचे पाणी चोरणे सुरू केले आहे. परिणामी अनेकांना पाणी मिळत नसल्याने पाणीटंचाईच्या तक्रारीचा पाऊस पडत आहे. नुकताच महापालिका व ओसीडब्लूने तक्रारीची दखल घेत चौकशी केली असता टुल्लू पंपाने पाणीचोरी होत असल्याचे आढळले.

गेल्या काही दिवसांत दहाही झोनमध्ये अल्प पाणीपुरवठा, एका रांगेत पाणी तर दुसऱ्या रांगेत पाणीच नाही, अशा तक्रारी महापालिका व ओसीडब्लूकडे येत असून अनेक नागरिकांनी परिसरातील काही जण टुल्लू पंपाचा वापर करीत असल्याचेही नमुद केले आहे. वाढत्या तापमानामुळे शहरातील अनेक घरांमधील विहिरी, बोअरवेलही कोरड्या पडल्या. त्यामुळे नागरिकांना नळातून पाण्याचाच आधार आहे. परंतु मागील वर्षी कारवाईनंतरही अनेकांंनी यंदाही टुल्लू पंप वापरात काढून पाणीचोरीचे प्रकार सुरू केले. नुकताच मानेवाडा भागातील मुनीश्वर यांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारीवरून केलेल्या पाहणीतून शिव अपार्टमेंटमध्ये थेट टुल्लू पंपातून पाणीचोरी होत असल्याचे उघडकीस आले. ओसीडब्लू व मनपाच्या हनुमाननगर झोने तत्काळ पंप जप्त केला. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा सुरळीत झाला. असाच प्रकार शहरातील विविध भागात सुरू असून कृत्रिम पाणीटंचाई तयार झाली आहे. त्यामुळे महापालिका व ओसीडब्लूपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. कारवाई करून महापालिका व ओसीडब्लू या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहे.

५१ टुल्लू पंप जप्त

महापालिकेने कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टुल्लू पंप जप्ती मोहीम सुरू केली आहे. नुकताच केलेल्या कारवाईत मनपा-ओसीडब्लूच्या पथकाने हनुमाननगर झोनमधील भीमनगर, पार्वतीनगर आणि शिवनगर, लक्ष्मीनगरमधील अजनी आणि खामला, सतरंजीपुरा झोनमध्ये बिनाकी या भागात तर धरमपेठ झोन, आसीनगर झोनमधील काही वस्त्या मध्ये कारवाई करीत ५१ टुल्लू पंप जप्त केले.

नळजोडणी बंदचा इशारा

इतरांचे पाणी हिसकावून घेणे बेकायदेशीर आहे. टुल्लू पंपाचा वापर करून पाणीचोरी करणे पाणी उपविधीनुसार दंडनीय गुन्हा आहे. टुल्लू पंपचा वापरणाऱ्याविरोधात कडक कारवाईचे धोरण अवलंबविण्यात आले आहे. टुल्लू पंप वापरल्यास कायदेशीर कारवाईसह नळजोडणीही बंद करण्यात येईल, असा इशारा महापालिका, ओसीडब्लूने दिला आहे. टुल्लू पंप सुरू दिसल्यास १८००-२६६-९८९९ या क्रमांकावर तक्रार किंवा झोन मॅनेजर, मनपा- ओसीडब्लू कार्यालयात संपर्क साधन्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पाणीचोरी सुरू असलेल्या वस्त्या

 • नेहरूनगर झोन : नंदनवन, हसनबाग राजेंद्रनगर, चिटणवीसनगर, धन्वंतरीनगर, डायमंडनगर.

 • धरमपेठ झोन : फुटाळा वस्ती, संजयनगर, काचीपुरा वस्ती.

 • सतरंजीपुरा झोन ः स्वीपर कॉलनी, कावरापेठ, बांगडे प्लॉट, तेलीपुरा पेवठा, पंचमगली, नागसेनवन, मोमीनपुरा, पानई पेठ.

 • धंतोली झोन ः सावित्रीबाई फुलेनगर, म्हाडा कॉलनी, ताजनगर, बाबुळखेडा,

  रघुजीनगर, सोमवारी वसाहत, सिरसपेठ, वकीलपेठ, चंदननगर, जुनी शुक्रवारी.

 • हनुमाननगर झोन ः रहाटेनगर टोली, अमरनगर, नवीन अमरनगर,

  गजानननगर, जानकीनगर, महाकालीनगर, बाबुळखेडा, पार्वतीनगर.

 • मंगळवारी झोन ः मानकापूर, बाबा फरीदनगर, फरस.

 • गांधीबाग झोन ः नवाबपुरा, भूतेश्वरनगर, भालदारपुरा, स्वीपर कॉलनी, जाटतरोडी १,२,३, कर्नलबाग.

Web Title: Nagpur Water Scarcity Temperature Rise Water Theft Increases

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top