नागपूर : शहराची तहान भागविणारा प्रकल्पच गुंडाळला! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur water supply issue Chaurai dam construction close

नागपूर : शहराची तहान भागविणारा प्रकल्पच गुंडाळला!

नागपूर : मध्यप्रदेशातील चौराई धरण बांधल्यानंतर शहरातील पाण्यात कपात झाली होती. भविष्यात शहर वाढणार असल्याने मागील फडणवीस सरकारने मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावातून तोतलाडोहपर्यंत बोगद्यातून पाणी आणण्याचा २ हजार ८०० कोटींचा प्रकल्प मंजूर केला होता. निविदांपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु आता हा प्रकल्प गुंडाळल्याची चर्चा असून राज्य सरकारच्या या कृतीची भविष्यात शहराला मोठी किंमत चुकवावी लागण्याची शक्यता बळावली आहे.

सध्या शहराची सीमा वाढत असून लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे २०२५ पर्यंत लोकसंख्येतील वाढ लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी २५० ते ३०० दलघमी वाढणार आहे. याशिवाय सातत्याने पावसाळ्यात पडणाऱ्या पावसातही घट होत असल्याने उन्हाळ्यात नागपूरकरांची ‘जलकोंडी’ वाढत आहे. सन २०१६-१७ मध्ये मध्यप्रदेशात चौराई बांधण्यात आले. तेव्हापासून शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जास्तच निर्माण झाली.

भविष्यात पाण्याची कोंडी होऊ नये, या हेतूने मागील फडणवीस सरकारकडून तत्कालीन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यप्रदेशातील लोहघोगरी गावाजवळून कन्हान नदीतून बोगद्याद्वारे १० टीएमसी पाणी तोतलाडोह जलायशात वळविण्याचा प्रकल्प मंजूर करून घेतला. या प्रकल्पासाठी २ हजार ८६४ कोटी रुपयेही मंजूर करून घेतले. पुढील पाच वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. परंतु, त्यानंतर राज्यात सरकार बदलले. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर या प्रकल्पाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले. या प्रकल्पाची प्रक्रिया निविदापर्यंत आली. मात्र राज्य सरकारने निधीसाठी हात आखडता घेतल्याने आता प्रकल्पच गुंडाळण्यात आल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे भविष्यात वाढलेली लोकसंख्या, नागरीकरण बघता शहरात जलकोंडी होण्याची शक्यता बळावली आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील सिमेंट रस्त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. परिणामी विहिरी, बोअरवेलच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहे. नव्या जलस्त्रोताची गरज असताना प्रस्तावित प्रकल्पही थंडबस्त्यात टाकण्यात येत असल्याने राज्य सरकारचा दुजाभाव तसेच शहरातील लोकप्रतिनिधींची उदासीनताही स्पष्ट होत आहे.

असा आहे प्रकल्प

मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील लोहघोगरी गावाजवळ वळण बंधारा बांधून बोगद्याद्वारे कन्हान नदीचे पाणी तोतलाडोह धरणात वळवण्याचे प्रस्तावित आहे. या बंधाऱ्याची लांबी १६० मीटर राहणार असून बंधाऱ्याची उंची ५.५ मीटर तर बोगद्याची लांबी ६२ किमी आहे. या बोगद्याचा व्यास ६.९ मीटर तर १२.२६ हेक्‍टर वनजमिनी यासाठी लागणार असून १० टीएमसी पाणी वळवण्याचेही प्रस्तावात नमुद आहे.

असा होणार होता खर्च

वर्ष प्रस्तावित खर्च

२०१९-२० ५८५ कोटी

२०२०-२१ ५७५ कोटी

२०२१-२२ ५७४ कोटी

२०२२-२३ ५७४ कोटी

२०२३-२४ ५५४ कोटी

Web Title: Nagpur Water Supply Issue Chaurai Dam Construction Close

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top