
नागपूर : तेरा वर्षात जुलै महिन्यात सर्वाधिक पाऊस
जलालखेडा - नरखेड तालुक्यात पावसाने थैमान घातले असून तालुक्यातील शेती पूर्णपणे वाया गेली आहे. सर्वच शेतांना नदीचे स्वरुप पाहायला मिळत आहे. गेल्या १९ दिवसापासून सततचा पावसाने शेतातील कापूस, तूर, सोयाबीन, ज्वारीचे पिके सडलेले असून आता ते काही भागात दुरुस्त होवू शकत नाही. दुबार पेरणी सुद्धा शेतकरी करू शकत नाही. २०१३ च्या अतिवृष्टीनंतर यावर्षी जुलै महिन्यात नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांना जगणे कठीण झाले आहे. नरखेड तालुका पूर्ण ओला दुष्काळ म्हणून शासनाने घोषित करावा, असे झाले नाही तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.
तालुक्यातील जलालखेडा, मेंढला, भिष्णूर, लोहारी सावंगा, सावरगाव, मोवाड, नरखेड, या मंडळभागात सततच्या पावसाने संपूर्ण पिकाची हानी झाली आहे. जाम व मदार नदीला आलेल्या पुराने त्या भागातील शेती पिके खरडून गेली. नदी व नाल्याचे पाणी चक्क शेतकऱ्याच्या शेतात घुसल्याने ३००० हेक्टर मधील पिकाचे मोठे नुकसान झाले.
सध्या राज्यात दोन मंत्री काम बघत आहे. एकीकडे संपूर्ण नरखेड तालुका पूर्णतः नुकसानीने वेढलेला आहे. त्यात सत्ताधारी खासदार ना शेतकऱ्यांच्या बांधावर आले. तर माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फक्त सावरगाव भागातील पं.स.उपसभापती स्वप्निल नागपूरे यांच्या गावात दौरा केला. तिथेच आढावा घेतला. दुसरीकडे आमदार अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख यांनी संपूर्ण तालुक्याचा दौरा केला. विरोधी पक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पोहचले तर सत्तापक्ष मात्र मंत्री पदासाठी रस्सीखेच करीत आहे. पण शेतकऱ्यांला वाऱ्यावर सोडले आहे.
पावसामुळे बहुताश संपूर्ण पिक खरडून गेलेले आहेत. तर काही शेतात पाणी साचल्याने पिके जागच्या जागी सडत आहेत. ही संपूर्ण तालुक्याची अवस्था नागपूर जिल्हाच्या जिल्हाधिकारी बघून गेल्या आहेत. ही संपूर्ण अवस्था बघता तत्काळ काटोल व नरखेड तालुका अतीवृष्टि घोषित करण्यात यावे व शेतकऱ्यांना आर्थिक मदत लगेच देण्यात यावी.
-वसंत चांडक, माजी सभापती, प. स. नरखेड
वर्षभर जेवढा पाऊस पडत नाही. तेवढा पाऊस एक महिन्यात पडल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. अनेकदा लागवड करून सुद्धा शेतात पीक नाही. खरीप हंगाम हातचा गेला शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे. अशा वेळी शासनाने तात्काळ मदत देण्याची गरज असताना महाराष्ट्रात राजकीय खेळ सुरू आहे. नुकसानग्रस्त भागाचा दौरा करायचा सोडून दिल्लीचे दौरे सुरू आहे.
-राजू हरणे, शिवसेना जिल्हाप्रमुख, नागपूर ग्रामीण
माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे स्वतः नरखेड तालुक्याचा दौरा करून गेले आहे. बावनकुळे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मागणी केली आहे. लवकरच राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करेल. हे सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे.
-उकेश चव्हाण, उपाध्यक्ष भाजप, नागपूर जिल्हा
शेतमजूरावर आले उपसमारीचे संकट
गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस सतत चालू असल्याने शेतीत काम सुद्धा नाही. त्यामुळे शेतमजूर सुद्धा हवालदिल झाला आहे. शेतमजूराच्या हाताला काम नसल्यामुळे त्यांनी खायचे काय, जगावे तरी कसे, असा प्रश्न शेतमजूरांनी उपस्थित केला आहे. शासनाला शेतकरी, शेतमजुरांची जराही काळजी असेल तर तातडीने मदत करावी अशी मागणी आहे.
मी सर्वच तलाठी यांना तात्काळ शेती व घरांची झालेली पडझड यांचे पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहे. लवकरच अहवाल उपविभागीय अधिकारी साहेब यांचेकडे पाठवणार आहे.
-डी.जी.जाधव, तहसीलदार, नरखेड.