नागपूर : दोन दिवसांच्या पावसानेच गाठली सरासरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur weather updates

नागपूर : दोन दिवसांच्या पावसानेच गाठली सरासरी

नागपूर : गेल्या दोन-तीन दिवसांपासून विदर्भात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे तूट भरून निघाली आहे. यवतमाळ व वाशीम हे दोन जिल्हे वगळता विदर्भात सगळीकडेच समाधानकारक पाऊस झाला असून, पावसाने सरासरी गाठली आहे. उशिरा का होईना पाऊस सक्रीय झाल्याने आता बळीराजाचीही चिंता दूर झाली आहे.

जून महिन्यात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांसह सारेच चिंतीत होते. पुरेशा पावसाअभावी विदर्भातील बहुतांश जिल्हे ''डेंजर झोन''मध्ये होते. अनेक जिल्ह्यांमध्ये पेरण्या खोळंबल्या होत्या. दुबार पेरणीची वेळ आली होती. मात्र जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने बॅकलॉग भरून निघाला आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात १ जूनपासून आतापर्यंत एकूण २३७ मिलिमीटर पाऊस झाला आहे, जो सरासरीच्या (२४६ मिलिमीटर) केवळ चार टक्के कमी आहे. हवामान विभागाच्या भाषेत कमी- जास्त १० टक्के पाऊस सरासरी मानला जातो.

विदर्भात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस गडचिरोली (३२५ मिलिमीटर) जिल्ह्यात झाला असून, त्याखालोखाल चंद्रपूर (३०० मिलिमीटर) व गोंदिया (२९३ मिलिमीटर) जिल्ह्यांत नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यातही (२५४ मिलिमीटर) सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सद्यस्थितीत यवतमाळ (१८५ मिलिमीटर) आणि वाशीम (१५५ मिलिमीटर) हे दोनच जिल्हे ''डेंजर झोन''मध्ये आहेत. येथे सरासरीच्या अनुक्रमे २० व ३२ टक्के कमी पाऊस पडला आहे. हवामान विभागाने या आठवड्यात विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता वर्तविल्याने हे दोन जिल्हेही लवकरच सरासरी पार करतील, अशी आशा आहे.

Web Title: Nagpur Weather Updates Two Days Heavy Rainfall Vidarbha Yavatmal Washim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..