
Nagpur : प्रकल्पबाधित गावातील शाळांवर अवकळा
वेलतूर(कुही) : पडक्या भिंती, गळकी छते, वर्गात येणारे पाणी, खिडक्यांची दुरवस्था, भिंतींना पडलेल्या भेगा, तुटलेले पत्रे- फुटलेली कवेलू अशी बिकट अवस्था कुही तालुक्यातील पुनर्वसन रखडलेल्या अनेक गावातील जिल्हा परिषदेच्या काही शाळांची व अंगणवाड्यांची आहे. यामुळे पालक, शिक्षक व सानुल्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा ऊर्जितावस्था आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असले तरी कुही तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ शाळा धोकादायक असल्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाची वाट बिकट झाली आहे. पावसाळ्यात या धोकादायक इमारतीमुळे कोणतीही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असली तरी इमारतीच्या दुरुस्तीसाठी आवश्यक निधी गेल्या कित्येक कित्येक वर्षात वर्गच झालेला नाही.
पुनर्वसनाच्या नावावर येथील विकास कामे थांबली आहेत हे विशेष. मात्र ह्या थांबलेल्या कामानी साऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. रूयाड, टेकेपार, रानबोडी अशा अनेक गावांत ही स्थिती असून ती सुधारण्यासाठी स्थानिक अधिकारी व लोकप्रतिनिधी जिवाचा आटापिटा करत आहेत. मात्र स्थिती जैसे थे असल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष खदखदत आहे.
तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्प व उमरेड करांडला अभयारण्यामुळे सुमारे १६ गावाचे पूर्णतः: पुनर्वसन झाले आहे. काही गावांचे तांत्रिक अडचणीमुळे पुनर्वसन रखडली आहेत. त्याचा चांगलाच फटका ह्या गावांना बसला असून शिक्षणाची मोठी दुरवस्था येथे पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या नागपूर जिल्ह्यांत गावागावांत लोकसंख्येनुसार अंगणवाडी, प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा आहेत.
त्यापैकी गेल्या वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे पावसाळा झाल्यानंतर अनेक शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले. यामध्ये त्यांनी काही गावातील शाळेच्या वर्ग खोल्या धोकादायक असल्याचा अहवाल बांधकाम विभागाकडून देण्यात आला होता. त्यात ह्या गावातील वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे नमूद आहे. मात्र नियोजित पुनर्वसनाच्या नावाखाली त्याकडे डोळे झाक करण्यात आली आहे, असा आरोप होत आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात रचनावादी शिक्षण पद्धत, बोलक्या भिंती, प्रगत शैक्षणिक धोरण, आयएसओ मानांकन शाळा, अशा वेगवेगळ्या उपक्रमातून जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा नावलौकिक मिळवीत असताना त्यात ह्या गावातील शाळा व शिक्षकासह- विद्यार्थी क्षमता असताना ही मागे पडत आहेत. त्यामुळे मोठी शैक्षणिक हानी होत असून ती हानी टाळण्यासाठी सरकार दरबारी मागणी करण्यात आली आहे ती लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा ग्रामस्थ करत आहेत. प्रकल्प बांधीत गावातील धोकादायक किंवा काही शाळांची दुरुस्ती करण्यासाठी अद्यापही निधी वर्ग न झाल्यामुळे शिक्षणाची वाट बिकट होत चालली आहे.प्रत्येक धोकादायक शाळांची इमारत पाडावीच लागते असे नाही. काही शाळांची दुरुस्ती करणे शक्य असते. अशा शाळांची दुरुस्ती केली जावी अशीही भावना पालक व्यक्त करत आहेत.
व्यथा रानबोडीची
उमरेड- करांडला अभयारण्यात विस्थापित झालेले गाव. कुही तालुक्यातील तारणा केंद्राअंतर्गत येणारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना आणि डिजीटलायझेशनचे वारे वाहत असताना शालेय मूलभूत सुविधांच्या अभावाला बळी पडली आहेत. गाव जंगल व्याप्त असल्याने उमरेड करांडला अभयारण्य घोषणेनंतर उमरेड परिसरातील खेडी शिवारात सन २०१९ मध्ये वन विभागाने त्यांचे तातडीने स्थानातंरण करून पुनर्वसन केले. तेव्हाच उपलब्ध माहितीनुसार वनविभागाने शाळेसाठी तात्पुरते टिनाचे शेड उभारून दिले. तेव्हापासून ही शाळा त्याच स्थितीत आहे. वन विभागाने कर्तव्य म्हणून पुढे एकही सुविधा पुरवल्या नसल्याची धक्कादायक माहिती आता पुढे आली आहे.
रूयाड-टेकेपारची कथा
कुही तालुक्यातील आमनदीच्या काठावरचे ही गावे गोसेखुर्द धरणाच्या बॅकवाटरमुळे प्रभावित झालेले आडवाटेला असलेले रूयाड-टेकेपार हे खेडे. शासनाच्या पुनर्वसन आराखड्यात गावात- शेतशिवारात धरणाचे पाणी शिरल्यावर सामील झाले. प्रत्यक्षात गावातील विकास कामे आधीच थांबलेले. त्यामुळे येथील अनेक सुविधांचा अभाव. विकास निधी अभावी दुरवस्था. आज येथील पालक आपल्या पाल्यांना शिक्षणासाठी बाहेर गावी पाठविण्यासाठी मजबूर आहेत. इमारती व पुनर्वसनाअभावी चिखली येथील शाळा एका पडक्या वाड्यात व समाज मंदिरात गेल्या कित्येक वर्षात भरत आहे.
प्रगत शिक्षणाच्या आपण बाता करत असताना तालुक्यातील पुनर्वसन रखडलेल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची व अंगणवाड्याची जीवघेणी दुरवस्था झाली आहे. ती सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. परिणामी आंदोलनही करावे लागले तरी चालेल. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परिस्थितीशी अवगत करून दिले आहे. पण कार्यवाही शुन्यतेने ती दुरवस्था वाढतच आहे.
- राजानंद कावळे, शेतकरी व कामगार नेते.