esakal | जि.प. निवडणूक : भाजपसह दोन्ही काँग्रेसमध्ये बंडखोरी, गणेश विसर्जनानंतर प्रचार
sakal

बोलून बातमी शोधा

nag zp

जि.प. निवडणूक : भाजपसह दोन्ही काँग्रेसमध्ये बंडखोरी, गणेश विसर्जनानंतर प्रचार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्हा परिषदेची निवडणूक (nagpur zp election) जाहीर झाली असली तरी ती पुन्हा स्थगित होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे एकाही उमेदवाराने अद्याप प्रचाराला सुरुवात केलेली नाही. सर्वांनीच गणेश विसर्जनापर्यंत वाट बघायचे ठरवले असल्याचे कळते.

हेही वाचा: OBC आरक्षणाशिवायच होणार ZP निवडणुका, तारीख जाहीर

निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असताना राज्य शासनाच्या विनंतीवरून राज्य निवडणूक आयोगाने कोरोनामुळे पुढील प्रक्रियेस स्थगिती दिली होती. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक टाळणे हाच राज्य सरकारचा यामागे उद्देश होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक टाळता येणार नाही असा आदेश दिला आहे. लगेच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या मतदानाची आणि मतमोजणीची तारीख जाहीर केली. सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात आहे. राज्य शासनाने अद्याप पूर्णपणे अनलॉक केलेले नाही. मंदिरे व सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्याप बंदी घातलेली आहे. ऑक्टोबर महिन्यात तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात आलेला आहे. याच महिन्यात निवडणूकसुद्धा होऊ घातली आहे. त्यामुळे प्रचार व प्रसार करावाच लागणार आहे. यासाठी जवळपास पंधरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

२७ ला कोण माघार घेणार?

२७ सप्टेंबर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. तोपर्यंत बंडखोरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी सर्वच पक्षातील नेत्यांचे प्रयत्न राहणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही प्रमुख पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. काँग्रेसने पाच जागा राष्ट्रवादीसाठी सोडल्या आहेत. त्यापैकी दोन जागांवर बंडखोर उभे आहेत. त्यापैकी एकही उमेदवार माघार घेण्यास तयार नसल्याचे कळते. या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील स्वतः काही उमेदवारांसोबत बुधवारी चर्चा करणार असल्याचे समजते.

भाजपची अडचण

भाजपने जिल्हा परिषदेतील विरोधीपक्षनेते अनिल निदान यांनाच उमेदवारी नाकारली होती. ते बावनकुळे यांचे कट्टर समर्थक समजल्या जातात. त्यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे भाजपने कुठल्याच उमेदवाराला बी फॉर्म दिला नव्हता. शेवटी पत्रकार परिषदेत घेऊन भाजपचे प्रदेश सरचिटणीस बावनकुळे व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी अनिल निदान हेच आमचे अधिकृत उमेदवार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे इतर दोघा बंडखोरांना बसवण्यासाठी त्यांना कसरत करावी लागणार आहे. यापैकी कोणीही माघार घेतली तरी आता निदान यांच्या मतदारसंघात भाजपला चिन्हाविनाच लढावे लागणार आहे.

loading image
go to top