Nagpur : पोषण आहार व्यवहाराची आयकर चौकशी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur ZP School Food grain Income tax investigation

Nagpur : पोषण आहार व्यवहाराची आयकर चौकशी?

नागपूर : महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये पोषण आहाराचे धान्य विकणाऱ्या सुसंस्कार महिला बचतगटाच्या चंद्रशेखर भिसीकरसह इतर तिघांना पोलिसांनी अटक केली. आता या प्रकरणात पोलिसांनी सारा ट्रेडर्स आणि सीया ट्रेडर्स यांच्या चौकशीसाठी आयकर विभागाद्वारे चौकशी करावी असे पत्र परिमंडळ तीनच्या पथकाद्वारे देण्यात आले आहे. विशेष म्हणजे संस्थांच्या व्यवहाराबाबत यापूर्वीच महापालिकेकडून कागदपत्रे मागविण्यात आलेली आहेत.

पोलिसांनी अहफाज पठाण वल्द अशफाक पठाण (वय २२, रा. खरबी), चंद्रशेखर प्रभाकर भिसीकर(वय ४५, रा. तांडापेठ) यांना अगोदरच ताब्यात घेतले होते. चंद्रशेखर भिसीकरच भाऊ अमोल भिसीकर याच्यासह चंद्रशेखरकडून धान्याची खरेदी करणाऱ्या सतीश निर्मलकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

दरम्यान सारा आणि सीया ट्रेडर्सच्या माध्यमातून दरवर्षी ९ कोटींची उलाढाल केली जाते. त्यामुळे त्यांच्या उलाढालीनुसार ते आयकर नियमित भरतात काय?, याशिवाय त्यांनी सादर केलेले आयटीआर हे योग्य आहेत काय? याची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी आयकर विभागाला पत्र दिले आहे.

विशेष म्हणजे, केंद्रीयकृत आहाराच्या वाटपात असलेल्या संस्थांनीही बरीच बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्यामुळे त्यांची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेला पोलिसांनी पत्र दिले आहे. त्यातून जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही या प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता आहे.

सुसंस्कारच्या पदाधिकाऱ्यांची मागविली यादी पोषण आहाराच्या व्यवहारामध्ये सुसंस्कार महिला बचतगटाच्या अध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस पदाधिकाऱ्यांच्या शोधात आहेत.

मात्र, दोन वर्षांपूर्वी सुसंस्कार बचतगटाच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे कार्यकारिणीच्या माहितीसाठी पोलिसांनी धर्मदाय आयुक्ताकडे पत्र पाठविले आहे.

संस्थाकडून बनावट ‘आयटीआर’

पोषण आहाराचे कंत्राट मिळावे यासाठी संस्थांनी आपल्या उलाढाल वाढवून दाखविण्यासाठी बनावट ‘आयटीआर’ तयार केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे या संस्थांच्या तपासणीसाठी त्यांच्या बॅंकांचे विवरणही मागविण्यात येत आहे. शिवाय असे बोगस ‘आयटीआर’ देणाऱ्या ‘सीए’ही चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.