esakal | भरारी पथके नावालाच

बोलून बातमी शोधा

The name of Bharari squads
भरारी पथके नावालाच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दहावी, बारावीच्या परीक्षांदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दरवर्षी भरारी पथके तयार केली जातात. मात्र, नेमण्यात आलेल्या भरारी पथकात जिल्हाधिकारी, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या पथकांकडून आजपर्यंत एकदाही एखाद्या केंद्राची तपासणी करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे मंगळवारपासून (ता.18) बारावीची परीक्षेला सुरुवात झाली असून, पहिला पेपर इंग्रजीचा होता.

अवश्य वाचा - ‘या’ वादग्रस्त विधानामुळे कोळसे पाटील पुन्हा चर्चेत


बारावीच्या परीक्षेदरम्यान गैरप्रकार होऊ नये यासाठी विभागाकडून 44 भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत. यापैकी सात पथक प्रत्येक जिल्ह्यात देण्यात आले आहेत. याशिवाय सहा पथके बोर्डाची आणि शिक्षणाधिकारी, उपसंचालक, तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्याही पथकांचा समावेश त्यात करण्यात आला आहे. मात्र, जिल्हाधिकारी, उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना बरीच प्रशासकीय कामे असल्याने त्यांना पथकात जाणे शक्‍य होत नाही. अशावेळी त्या पथकांमध्ये अधिकाऱ्यांऐवजी दुसऱ्यांना पाठविणे अपेक्षित असते. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठल्याच सूचना दिल्या जात नाही. दुसरीकडे बोर्डाकडून तसे पत्रही विभागांना देण्यात येत नाही. त्यामुळे नेमून देण्यात आलेली पथके सालाबादाप्रमाणे केवळ नामधारी असल्याचे दिसून येत आहेत. मात्र, याचा फटका अनेकदा बोर्डाच्या नियमित भरारी पथकाला बसतो. त्यांच्यावर अधिकची जबाबदारी येत असते. त्यामुळे अनेकदा वेळेअभावी थातूरमातूर तपासणी करीत पुढे निघावे लागते. दरम्यान यासंदर्भात विभागीय मंडळ अध्यक्ष रविकांत देशपांडे यांना विचारणा केली असता, त्यांनी बोलता येणे शक्‍य नसल्याचे स्पष्ट केले.

रिक्‍त पदांमुळे पथकांना अधिकारी मिळेना

विभागात जिल्हावार आणि बोर्ड स्तरावर नेमण्यात आलेल्या पथकांनाही आता रिक्त पदांचा फटका बसतो आहे. विभागात विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे पथकामध्ये जाताना अनेकदा मनुष्यबळाचा अभाव जाणवतो. विशेष म्हणजे ज्यांची नेमणूक करण्यात येते, त्यांना इतर कारणांमुळे त्यातून माघार घ्यावी लागते. त्यामुळे सात ते आठ जणांच्या भरारी पथकांची संख्या आता सहा आणि पाचवर येताना दिसत आहे.