esakal | महापौर, आयुक्तांच्या नावे खड्ड्यांचे नामकरण
sakal

बोलून बातमी शोधा

nagpur

महापौर, आयुक्तांच्या नावे खड्ड्यांचे नामकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : शहरातील खड्ड्यांना महापौर, आयुक्तांसह इतर पदाधिकाऱ्यांची नावे देत सिटीझन फोरमने आज अनोखे आंदोलन केले. एवढेच नव्हे तर खड्ड्यांची पूजा करून पदाधिकाऱ्यांच्या नावे नामकरण करीत ‘नागपूर तुला महापालिकेवर भरोसा नाय काय?’ हे विडंबन गीतही गायले.

सिटीझन फोरमच्या सदस्यांनी मानस चौक, लोहापूल, माउंट रोड परिसरात आज सकाळी अनोखे आंदोलन केले. मानस चौक व सदर मार्गावरील खड्ड्यांभोवती चुन्याने रेखांकन करीत या खड्ड्यांची हार, फुले वाहून आणि अगरबत्तीने ओवाळून पूजा केली. नारळ फोडत या खड्ड्यांचे नामकरण केले. मानस चौक येथील खड्ड्याला महापौर दयाशंकर तिवारी यांचे नाव देण्यात आले.

लोहापूल परिसरातील खड्ड्यांना स्थायी समितीचे सभापती प्रकाश भोयर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे व सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे यांची नावे देण्यात आली. माउंट रोड सदर येथील खड्ड्याला मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांचे नाव देण्यात आले. यावेळी ‘नागपूरच्या रस्त्यात झोल झोल, रस्त्यातले खड्डे खोल खोल, लोकांचा पैसा माती मोल, नागपूर तुला मनपावर भरोसा हाय का? असा प्रश्न विडंबन गीतातून विचारण्यात आला.

हेही वाचा: Nagpur : शुल्क घेतले मनपाने, हेलपाटे ‘नासुप्र’त

खड्ड्यांच्या समस्येबाबत महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने थातूरमातूर काम करून काही खड्डे बुजवले. रस्त्यावर बारीक चुरीचा सडा पसरला असल्याने दुचाकीचालक घसरून पडत आहेत.

यावेळी अभियानाचे संयोजक रोहित कुंभारे व प्रतीक बैरागी यांच्यासह अमित बांदूरकर, अभिजित झा, अभिजितसिंह चंदेल, वैभव शिंदे पाटील, प्रज्वल गोड्डे, शिवम उमरेडकर, रजत पडोळे, तेजस पाटील, संकेत महल्ले, संदीप पटले, रूपेश चौधरी, अथर्व काकडे, लिखित राऊत, मिहिर पेलणे, संदेश उके, अमेय पन्नासे, हेमंत शाहू आदी उपस्थित होते.

आता आमदारांची नावे देणार

खड्ड्यांबाबत महानगरपालिका व पदाधिकाऱ्यांनी चुकीची माहिती देत दिशाभूल केली. त्यांचे दावे व माहिती किती खोटी आहे हे दाखवण्यासाठी सिटिझन्स फोरमने हे आंदोलन केल्याचे फोरमचे पदाधिकारी प्रतीक बैरागी म्हणाले. यापुढे विधानसभा स्तरावरील खड्ड्यांना आमदार, वाॅर्ड स्तरावरील खड्ड्यांना नगरसेवकांची नावे देण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.

loading image
go to top