नापास आणि काठावर पास स्वयंसेवक | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. रवींद्र (छोटू) भोयर

नागपूर : नापास आणि काठावर पास स्वयंसेवक

नागपूर : ऐनवेळी विरोधी पक्षातील नेता आयात करून त्याच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणे ही खरे तर भाजपची खास पद्धत. मात्र, धक्कातंत्राचा हा फॉर्म्युला नागपुरात भाजपवर उलटताना दिसत आहे. संघाचे स्मृतिमंदिर हे पावन स्थळ ज्या प्रभागात आहे त्या प्रभागाचे नगरसेवक डॉ. रवींद्र (छोटू) भोयर हे गळाला लागल्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना गुदगुल्या होत असतील. पण, यामुळे काँग्रसमधील अस्वस्थता निश्चितच लपणारी नाही.

भोयर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले कार्यकर्ते असल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यापेक्षा त्यांच्यासाठी नैतिकतेची चौकट वेगळी आहे. ही चौकट भेदून संघटनेवर बंदी लादणाऱ्या पक्षात ते जात असतील तर भाजपमध्येही संस्कार, शिस्तबद्ध कार्यकर्ते वगैरे या गोष्टी भाषणात केवळ शोभून दिसतात, असाच याचा अर्थ. सुदृढ हिंदू राष्ट्र आणि भगवा ध्वज यासाठी कुठल्याही फळाची अपेक्षा न करणारा झटणारा कार्यकर्ता या पक्षाचे बलस्थान मानले जायचे. मात्र, राजकीय स्वार्थ या तत्त्वांवर भारी पडत असल्याचे आता स्पष्‍ट होऊ लागले आहे. अन्यथा पक्षाने अनेक पदांनी गौरविल्यानंतरही भोयर हे पक्ष सोडण्याचा विचार का करतील?

हेही वाचा: सदृढ शरीरासाठी जिमची क्रेझ

भाजपमध्ये वारंवार अपमान झाला, बाहेरून आलेल्यांना संधी मिळाली असे सांगत गेल्या ३५ वर्षांपासून पक्षात असलेले भोयर काँग्रेसवासी झाले. या घटनेकडे एका कार्यकर्त्याची नाराजी असे साधेपणाने बघता येणार नाही. भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना पाठवलेल्या एका ओळीच्या राजीनामा पत्रात भोयर यांनी वैयक्तिक कारणासाठी आपण प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. भोयर हे पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आहेत. ते शहराचे उपमहापौर आणि नागपूर सुधार प्रन्यासचे विश्वस्तही होते. त्यामुळे पक्षाच त्यांच्यावर अन्याय झाला असे मानण्यास आधार सापडत नाही. उलटपक्षी मनमानी वागूनही पक्षाने त्यांचे लाडच पुरविले आहेत. मागे अभय पुंडलिक या स्वयंसेवकाचे नाव एका घोटाळ्यात पुढे आल्यानंतर संघाचे ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांनी त्याला नापास स्वयंसेवक असे संबोधले होते. अशा नापास आणि काठावर पास स्वयंसेवकांची मोठी संख्या भाजपमध्ये आहे. त्यात आज त्यांच्या नावाची भर पडली. भोयर यांनी काँग्रेसच्या खांद्यावर चढून मोठी उडी घेतली आहे. ही उडी कितपत पुढे जाते हे बघणे रंजक ठरेल.

‘बळी तो कान पिळी’ या न्यायाने काँग्रेसचे काम चालते. या पक्षातील सगळ्या नेत्यांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतात. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांचे संख्याबळ लक्षात घेता कागदावर तरी भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी प्रबळ दिसते. म्हणूनच काँग्रेसमधून कुणी लढून उगाच खर्च करण्यास फारसे इच्छुक नव्हते. भोयर हे पक्षात आल्यामुळे गडकरींच्या शहरात भाजपला खिंडार पाडले असे त्या नेत्यांना सांगता येणार आहे. भोयर यांच्या उमेदवारीची राष्ट्रीय स्तरावर बातम्या होईल आणि भाजपच्या नेत्यांची कटकट वाढेल, हेही उद्देश यातून साध्य होणार आहे. भोयर हे काँग्रेसमध्ये आयात उमेदवारच आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते किती काळ भोयर यांना खांद्यावर बसू देतात, हेही बघावे लागेल. एक मात्र नक्की. भोयर यांच्या बंडखोरीमुळे निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

loading image
go to top