नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शिक्षण होणार अनिवार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navin Agarwal

नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन शिक्षण होणार अनिवार्य

नागपूर - नैसर्गिक आपत्ती दिवसेंदिवस वाढतच चालल्याने विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापनाबाबतचे शिक्षण अनिवार्य करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी एक मॉडेल अभ्यासक्रम तयार केला आहे.

पूर, भुकंप आणि नैसगिक आपदांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून परिस्थिती हाताळणे फायदशीर ठरते. हे लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अख्यत्यारित असलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे (एनआयडीएम) तत्कालीन कार्यकारी संचालक मेजर जनरल मनोजकुमार बिंदल यांच्या मार्गदर्शनात प्रा. संतोष कुमार, शेखर चतुर्वेदी, डॉ. प्रीती सोनी यांनी पदवी आणि पदव्युत्तर स्तरावर मॉडेल अभ्यासक्रम तयार करण्यासाठी सात सदस्यांची समिती तयार केली होती. त्यामध्ये महाराष्‍ट्रातून दादा रामचंद बाखरू सिंधू महाविद्यालयाचे कुलसचिव नवीन महेशकुमार अग्रवाल यांचा समावेश होता.

या समितीला अभ्यासक्रम तयार करण्याचा टास्क देण्यात आला होता. अभ्यासक्रमावर विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थाकडून सूचना मागितल्या. त्यांचा समावेश करून अभ्यासक्रमाचा मसुदा युजीसीकडे पाठवण्यात आला. आता हा अभ्यासक्रम विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सुरू करण्यासाठी युजीसीद्वारे कळवण्यात आले आहे.

पदविका अभ्यासक्रम

पदवीचे पहिले वर्ष पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना ‘डीआरआरएम’ वर प्रमाणपत्र मिळेल आणि दोन वर्षांनी आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विशेष क्षेत्रातील पदवी मिळेल. विद्यार्थी एका वर्षानंतर प्रमाणपत्र कार्यक्रमातून बाहेर पडणे आणि युजीसीद्वारे पुढील ठरलेल्या कालावधीत आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित कोणत्याही विशेष क्षेत्रात पदवीच्या दुसऱ्या वर्षात पुन्हा सामील होणे निवडू शकेल. या कार्यक्रमात प्रवेशासाठी पात्रता ५५ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे असेल. यामध्ये प्रशिक्षित व्यावसायिक तयार केले जातील. कार्यक्रम दोन-सत्रांच्या आधारावर ३८ क्रेडिट्सचा असेल.

पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम

पीजी डिप्लोमा प्रोग्राम: यामध्ये देखील विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षाचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर पीजी प्रमाणपत्र मिळेल आणि दोन वर्षानंतर विद्यार्थ्यांना पीजी डिप्लोमा मिळेल. यामध्ये कोणत्याही शाखेतील ४५ टक्के गुणांसह पदवीधरांना प्रवेश घेता येईल. हा दोन सेमिस्टर कार्यक्रम एकूण ४५ क्रेडिट्सचा असेल.

असा असेल अभ्यासक्रम

फाउंडेशन अभ्यासक्रम : चौथ्या सेमिस्टरमध्ये आपत्ती जोखीम कमी करणे व्यवस्थापन हा अनिवार्य विषय असेल. तीन क्रेडिट आणि १०० गुणांचा पेपर असेल ज्यामध्ये ६० टक्के गुण बाह्य आणि ४० टक्के गुण अंतर्गत असतील. २० गुणांचे फील्ड वर्कदेखील असेल. तर या संपूर्ण कोर्समध्ये ४५ तासांची व्याख्याने असतील. हा कोर्स फाऊंडेशन कोर्स अंतर्गत चौथ्या सेमिस्टरमध्ये दिला जाईल आणि अंडरग्रॅज्युएट स्तरावर प्रत्येक शाखेत लागू केला जाईल.

४० टक्के स्थानिक आपत्तीचा समावेश

भारतात भौगोलिक क्षेत्राच्या आधारे दरड कोसळण्यापासून, सागरी वादळे, पूर येण्यापासून इतर आपत्ती येतच असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रदेशाची आपत्ती वेगळी असते. त्यामुळे देशभरातील आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध विषयांवरील यातील ६० टक्के अभ्यासक्रम एकसमान असणार आहे. तर स्थानिक भौगोलिक क्षेत्राच्या आधारे ४० टक्के अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केला जाईल, जेणेकरून आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित लोकांना आपत्तीत सामान्य लोकांना मदत करण्यास सक्षम करता येईल.

Web Title: Natural Disaster Management Education Will Be Compulsory Model Syllabus Of Ugc Prepared

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..