Navratri Festival 2022 : आजपासून नवरात्रोत्सव : जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navratri Festival 2022 ghatasthapana

Navratri Festival 2022 : आजपासून नवरात्रोत्सव : जाणून घ्या पूजा विधी, मुहूर्त

नागपूर : शक्ती आणि ऊर्जा घेऊन येणारा नवरात्रोत्सव आजपासून प्रारंभ होत आहे. घटस्थापना झाल्यापासून पुढील नऊ दिवस चैतन्याचे वातावरण राहणार आहे. ‘प्रेम से बोलो, जय माता दी’, ‘जयकारा शेरावाली मा का, बोलो साचे दरबार की जय...’ असा गजर करीत मूर्तिकारांकडे निघालेले भाविक असे वातावरण दिवसभर शहरात होते. गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा झाल्यानंतर आता शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

मागील २ वर्षांपासून कोरोनामुळे सध्या पद्धतीने उत्सव साजरे केले जात होते. निर्बंध उठवल्यानंतर उत्साह द्विगुणित झाला आहे. यंदा गणेशोत्सवाचा सणही थाटात साजरा करण्यात आला आहे. आता अनेकांना उत्सुकता लागली आहे. नवरात्रीची, घरातील घटस्थापना असो किंवा दांडिया, तरुणाई सज्ज झाल्याचे दिसत आहे. दरम्यान, घरोघरी घटस्थापना करून वर्षानुवर्षांची चालत आलेली परंपरा जपली जाईल आणि याही वर्षी अनेकांच्या घरी घट बसवले जातील.

घटस्थापना पूजा विधी :

  • -घटस्थापना करताना घट पाटावर किंवा चौरंगावर मांडला जातो. त्यामुळे चौरंग किंवा पाटाखाली रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू वाहा.

  • -चौरंग किंवा पाटावर लाल वस्त्र अंथरावे.

  • -टोपली किंवा परातीत माती घालून त्यात मिश्र धान्य पेरा. त्यामधोमध कलश ठेवा.

  • -कलश तयार करताना त्यात हळद-कुंकू, सुपारी, अक्षत, दूर्वा, सव्वा रूपया घाला.

  • -कलशामध्ये नागवेलीची किंवा पाच प्रकारच्या पाच विविध पानांच्यामध्ये नारळ ठेवून सजवा.

  • -कलशाला हळद कुंकू, गंध अक्षत वाहून पूजा करा.

  • कलशावर तुम्ही ओढणी देखील चढवू शकता.

  • -दर दिवशी सकाळ-संध्याकाळ आरती करून पूजा करा.

  • -पेरलेल्या धान्यावर दिवसातून दोनदा थोडे थोडे पाणी घाला.

घटस्थापना मुहूर्त

सकाळी : ६.३० ते ८.३०, ९.३० ते ११, दुपारी : १२.३० ते सायंकाळी ६.३० वाजता हा सर्वोत्तम मुहूर्त.