esakal | शाळा सुरू, पण घंटा वाजणार नाही! 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

शैक्षणिक सत्र शुक्रवार, 26 जूनपासून विदर्भात नेहमीप्रमाणे सुरू होत असले, तरी शालेय इतिहासात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा सुरू होणार; पण शाळेची घंटा वाजणार नाही. शाळेत विद्यार्थीसुद्धा येणार नाहीत. 

शाळा सुरू, पण घंटा वाजणार नाही! 

sakal_logo
By
सुधीर बुटे

काटोल (नागपूर) : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसाची विद्यार्थ्यांना उत्सुकता असते. नवीन गणवेश, नवी पुस्तके, नवीन मित्र-मैत्रिणी, जुन्या मित्रांची भेट अशा उत्सुकतेच्या वातावरणात शाळेच्या परिसरात किलबिलाट होतो. मात्र, 2020-21 शैक्षणिक सत्र शुक्रवार, 6 जूनपासून विदर्भात नेहमीप्रमाणे सुरू होत असले, तरी शालेय इतिहासात प्रथमच शाळेच्या पहिल्या दिवशी शाळा सुरू होणार; पण शाळेची घंटा वाजणार नाही. शाळेत विद्यार्थीसुद्धा येणार नाहीत. 

हा सर्व बदल कोविड-19मुळे शासनाला करावा लागत आहे. त्या दृष्टीने विद्यार्थी, पालकांचेसुद्धा लक्ष वेधले आहे. शासन धोरणानुसार शालेय व्यवस्थापन समितीची शिक्षकांसह सभा घेऊन शाळा कशा प्रकारे सुरू करणार, याबाबत नियोजन करण्यात येणार आहे. शाळेचे प्रवेश, व्यवस्थापन, वेळापत्रक, शाळा भरण्याच्या वेळा, सोशल डिस्टन्स, मास्क, शाळा व वर्ग सॅनिटायझ करणे आदी अनेक प्रश्‍न यावर्षी हाताळावे लागणार आहेत. 

जूनमध्ये रिधोरा ग्रामीण भागात पहिली केस आढळली. तीन जण कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर चेन ब्रेक करण्यास काटोल ग्रामीण रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांना यश आले. 

आता शाळा सुरू होत असल्याने आरोग्य विभाग, परिवहन विभाग (एसटी), वाहतूक पोलिस, सुरक्षा विभाग यांचीसुद्धा जबाबदारी वाढणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सांगितले. 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील शाळा बंद असल्या, तरी अनेक शाळांमधून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले. शहरी भागात काही प्रमाणात ऑनलाइन शिक्षणासाठी पायाभूत सुविधा आहेत. तर ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुविधांच्या अभावी पालकांची मोठी तारांबळ उडाली असल्याचे दिसून आले. त्यातच उद्या नवीन सत्राला सुरुवात होत आहे. मात्र, शाळा सुरू; पण घंटा वाजणार नाही, असेच दृश्‍य दिसणार आहे. 

हेही वाचा : दरोड्याच्या तयारीत होते आरोपी, पोलिसांना लागला सुगावा आणि...

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या शुभेच्छा 
शुक्रवारपासून व्यवस्थेनुसार शाळा सुरू होत आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नवीन सत्रातील शाळा सुखरूप सुरू व्हाव्या, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

कोविड-19चा प्रभाव बालकांवर प्रथम पडणार असल्याने पहिल्या टप्प्यात 1 जुलैपासून केवळ माध्यमिक शाळा वर्ग 9 व 10 तसेच कनिष्ठ महाविद्यालय इयता 12 वर्ग तीन-तीन तासांची शाळा व प्रत्येक वर्गात 30 पर्यंत विद्यार्थी व प्रत्येक बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी व्यवस्था करावयाची आहे. शासनाने शैक्षणिक धोरण ठरविले असून त्याची केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांनी अंमलबजावणी करावी. 
-दिनेश धवड, गटशिक्षणाधिकारी 

 

loading image
go to top