

नागपूर : कोरोनाची स्थिती जिल्ह्यात अतिशय घातक झाली आहे. बाधितांच्या संख्येत काहीसी घट झाली तर आता मृत्यूचे भय वाढले आहे. जिल्ह्यातील मेयो, मेडिकलसह विविध रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांचा मृत्यूचा टक्का वाढला आहे. नववर्षात तीन महिन्यांतील मृत्यूंचा उच्चांक शनिवारी कोरोनाने गाठला आहे. आज एकाच दिवशी ५४ जणांचा बळी गेला आहे. तर तीन हजार ६८८ नवीन बाधितांची भर पडली. एकाच दिवसात झालेल्या सर्वाधिक मृत्यूने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
नागपूर जिल्ह्यात ९ सप्टेंबर २०२० रोजी ५९ मृत्यू नोंदवले गेले होते. वर्षभरातील मृत्यूचा उच्चांक होता. मात्र, नवीन वर्षात कोरोना संसर्गाचे सारे उच्चांक मोडून काढत आहे. शुक्रवारी बाधितांची रेकॉर्डब्रेक संख्या आढळून आली. एकाच दिवशी ४ हजार ९५ बधित आढळले होते. आता मृत्यूचे भय देखील वाढले असून ५४ मृत्यू झाले. गतवर्षीच्या उच्चांकाजवळ मृत्यूची संख्या पोहोचत आहे.
१ मार्च रोजी केवळ ६ मृत्यू होते. परंतु, २२ मार्च आणि २४ मार्च २०२१ रोजी ४० मृत्यूची नोंद झाली होती. तर अवघ्या तीन दिवसानंतर ५४ मृत्यू झाले. शनिवारी (ता. २७) शहरात २४ तासांत ३३, ग्रामीण १७, जिल्ह्याबाहेरील ४ जण कोरोनामुळे दगावले आहेत. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ३ हजार ११६ झाली. ग्रामीण भागातील मृत्यूची संख्या ९१७ झाली आहे. तर जिल्ह्याबाहेरील मृत्यूचा आकडा ८४०वर पोहोचला आहे. असे एकूण जिल्ह्यात ४ हजार ८७३ जण कोरोनाचे बळी ठरले आहेत.
दिवसभरात शहरात २ हजार ५९५, ग्रामीण भागात १ हजार ८९ तर जिल्ह्याबाहेरील ४ असे एकूण ३ हजार ६८८ नवीन कोरोनाबाधित आढळले. यामुळे २ लाख १४ हजार ८५० कोरोनाबाधितांची नोंद जिल्ह्यात झाली आहे. दिवसभरात १६ हजार ५३५ संशयित व्यक्तींचे कोरोना चाचणीसाठी घेण्यात आले. त्याचे अहवाल रविवारी अपेक्षीत आहे. कोरोना बाधितच्या अहवालाचे प्रमाण २०.९२ टक्के आहे.
मार्च महिन्यात पहिल्यांदा दिवसभरात शहरात २ हजार ८६७ आणि ग्रामीण ३६० अशा एकूण ३ हजार २२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या कोरोनामुक्तांची संख्या १ लाख ३९ हजार ८८६, ग्रामीण ३२ हजार ७४८ अशी एकूण १ लाख ७२ हजार ६३४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र, अद्यापही कोरोनामुक्तांचे प्रमाण ८०.३५ टक्क्यांवर आहे. यात वाढ होण्याचे संकेत शनिवारी मिळाले आहेत.
शहरात २७ हजार ५५०, ग्रामीण भागात ९ हजार ७९३ अशा एकूण ३७ हजार ३४३ सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या झाली आहे. त्यातील गंभीर संवर्गातील ४ हजार ७७१ रुग्ण मेयो, मेडिकल, एम्ससह विविध रुग्णालयात तसेच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. २८ हजार ८८४ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत असून नवीन ३ हजार २२७ रुग्णांवर उपचाराची प्रक्रिया सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.