esakal | हिरवे नागपूर नावालाच! १० कोटींच्या वृक्ष लागवडीचा विसर
sakal

बोलून बातमी शोधा

हिरवे नागपूर नावालाच!

हिरवे नागपूर नावालाच! १० कोटींच्या वृक्ष लागवडीचा विसर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या प्रदूषणमुक्त व हिरव्या शहराच्या सातत्याने भाषणातून उल्लेखामुळे दोन वर्षांपूर्वी स्थायी समितीने १० कोटी रुपयांची वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अधिकाऱ्यांच्या बेफिकिर वृत्तीची किड लागल्याने शहर हिरवे करण्याचे स्थायी समितीचे मनसुबे उधळले गेल्याचे चित्र आहे. शहरात वाढत्या सिमेंटीकरणामुळे जास्तीत जास्त झाडे लावण्याची गरज असतानाही अधिकाऱ्यांची बेफिकिर वृत्ती भविष्यात नागपूरकरांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे.

नागपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचसोबतच शहरात दुचाकींची संख्या प्रमाणाबाहेर गेली असून अन्य चारचाकी आणि तीन चाकी वाहनेही प्रचंड प्रमाणात वाढल्याने प्रदूषणाचा स्तर वाढत चालला आहे. सिमेंटीकरणामुळे शहराच्या तापमानातही बदल होत आहे. त्यामुळे एकेकाळी ग्रीन सिटी म्हणून ओळख असलेल्या नागपुरात आणखी झाडे लावण्याची गरज असून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्या भाषणातून अनेकदा महापालिकेला याबाबत सूचना केल्या. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर नंदा जिचकार यांनीही शहरात ५० हजार झाडे लावण्याचा संकल्प जाहीर केला होता. स्थायी समितीने वृक्ष लागवडीसाठी १० कोटी रुपये मंजूर केले होते.

परंतु स्थायी समितीच्या या निर्णयाचा बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. शहरात मेट्रोच्या खाली रस्त्याच्या दुभाजकांवर काही भागात शोभिवंत झाडे लावण्यात आली. परंतु त्यामुळे शहराच्या हिरवळीत भर पडली. परंतु प्रदूषण रोखण्यात शोभिवंत झाडे उपयुक्त नाही. महापालिकेने दोन वर्षांत झाडे लावण्याचे गांभीर्यच दाखवले नसल्याने वाहनांचे प्रदूषण कायम आहे. पश्चिम नागपूर, विमानतळ मार्गावर वृक्षांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. परंतु शहरातील मनीष नगर, मानेवाडा रोड, हुडकेश्वर रोड या भागात झाडेच नाहीत. महापालिका अधिकाऱ्यांच्या बेफिकिर वृत्तीमुळेहा विरोधाभास आहे.

आज सभागृहात गाजणार विषय

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी असून यात विविध विषयांसोबतच १० कोटींच्या झाडांचा हिशेब मागण्याची तयारी आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे. १० कोटींच्या वृक्ष लागवडीचे काम आजपर्यंत झाले असून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शहराला हिरवे करण्याच्या धोरणाला हरताळ फासला गेल्या असल्याचे दटके यांनी दिलेल्या नोटीसमध्ये नमुद केले आहे.

loading image
go to top