कट्टर विरोधकांनाही गडकरींनी पाडली भूरळ, नाना पटोलेंच्या सोशल मीडिया ग्रुपवरही कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नितीन गडकरी

कट्टर विरोधकांनाही गडकरींनी पाडली भूरळ, नाना पटोलेंच्या सोशल मीडिया ग्रुपवरही कौतुक

नागपूर : गेल्या काही दिवसात मरगळलेल्या आरोग्य यंत्रणेत प्राण फुंकणारे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या कार्याने कट्टर विरोधकांनाही भुरळ पाडल्याचे लोकसभा निवडणुकीत त्यांना आव्हान देणारे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने असलेल्या ग्रुपवरही होणाऱ्या स्तुतीतून दिसून येत आहे.

हेही वाचा: भाग्यश्रीचं वारली पेंटिंगमधून रामायण दर्शन पोहोचलं मुख्यमंत्र्यांपर्यंत; दिली कौतुकाची थाप

केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरच नव्हे तर विदर्भातील आरोग्य यंत्रणेत विश्वासाचे वातावरण तयार केले. शहरातील अनेक रुग्णालयात ऑक्सिजन, व्हेंटिलेटरपासून तर इंजेक्शनच्या तुटवड्यावरही उपाय शोधून काढला. विभागीय आयुक्त, आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन काय हवं, नको यावर चर्चा करून उपाय सांगितले. त्यामुळे शहरातील आरोग्य यंत्रणाच नव्हे तर नागरिकांतही दिलासादायक वातावरण तयार झाले. या काळात मृत्यूदर अधिक असल्याने शहर, जिल्ह्यात सुतकी व नकारात्मक वातावरण होते. त्यांच्या प्रयत्नाने शहर, जिल्हा व विदर्भातील आरोग्य यंत्रणेत आत्मविश्वास निर्माण झाला. त्याच्या या कार्याची छाप राष्ट्रीय स्तरावरही दिसून आली. त्यांच्याच पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी आरोग्य खात्याची जबाबदारी नितीन गडकरी यांच्याकडे देण्यात यावी, असं त्यांनी ट्विट केले होते. यानंतर सोशल मीडियावर नितीन गडकरी हा हॅशटॅग सगळ्यात जास्त ट्रेंड होऊ लागला होता. यावर राष्ट्रीय पातळीवर चांगलीच चर्चा रंगली.

हेही वाचा: तिसऱ्या लाटेपेक्षा मुलांच्या आहाराकडे लक्ष द्या; वाचा काय सांगतात डॉ. गावंडे

नितीन गडकरींच्या कट्टर विरोधकांनीही सोशल मीडियावर त्यांच्या कार्याचा गौरव करताना राष्ट्रीय स्तरावर आरोग्य यंत्रणा त्यांच्याकडे सोपविण्यात यावी, यावरही चर्चा रंगली. आता तर मागील लोकसभा निवडणुकीत त्यांना आव्हान देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने फेसबुकवर असलेल्या ग्रुपवरही गडकरी यांचे कौतुक करणाऱ्या पोस्ट बघायला मिळत आहे. फेसबुकवर नाना पटोले-कॉंग्रेस असा ग्रुप असून यावर काँग्रेसचे कार्यकर्ते किरण इंगळे यांनी महाराष्ट्र भाजपमध्ये केवळ नितीन गडकरी पंतप्रधानपदाला न्याय देणारे योग्य नेते असून अशा नेत्यांना वाढविले व जागविले पाहिजे, असे कौतुक केले आहे. गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीत पटोले यांचा पराभव केला होता. विरोधी पक्षाच्या नेत्याच्या फेसबुक पेजवर गडकरींची स्तुती होत असल्याने काँग्रेसमध्येही केवळ टीका करणारेच नव्हे तर कामाचा आदर करणारे कार्यकर्ते, नेते असल्याचे अधोरेखित झाले.

मतदार संघाबाहेरही केली मदत -

नुकतेच हिंगणघाट येथील एका डॉक्टरने कोव्हीड बेड वाढवून देण्यासंदर्भात मनसे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांची भेट घेतली. हेमंत गडकरी यांनी तात्काळ केंद्रीयमंत्री गडकरी यांच्याशी फोनवर चर्चा केली. गडकरी यांनी हेमंत गडकरी यांना बोलावून घेतले व वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयात कोव्हीड बेड वाढविण्याचे निर्देश दिले. एवढेच नव्हे केवळ बेड वाढविण्याच्या अपेक्षेने आलेल्या डॉक्टरांना गडकरी यांनी व्हेंटिलेटर इतर २५ लाखांचे साहित्यही दिल्याचे हेमंत गडकरी यांनी सांगितले.

Web Title: Nitin Gadkari Is Appreciated On Social Media Group Of Nana

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur
go to top