
नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या परखड आणि थेट बोलण्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. नागपुरात आयोजित महानुभव पंथीय सम्मेलनात बोलताना त्यांनी पंथ आणि संप्रदायांपासून मंत्र्यांना दूर ठेवण्याचा सल्ला दिला. "पंथ आणि संप्रदायांनी मंत्र्यांना आपल्या कामापासून लांब ठेवले पाहिजे. जिथे मंत्री घुसतात, तिथे आग लावल्याशिवाय राहत नाहीत," असे त्यांनी ठणकावून सांगितले. धर्मकारण, समाजकारण आणि राजकारण या तीन वेगवेगळ्या गोष्टी असून, त्यांना एकत्र मिसळणे चुकीचे आहे, असेही ते म्हणाले.