Nitin Gadkari : स्मार्ट शहरांच्या धर्तीवर स्मार्ट व्हिलेजेस उभारू

नितीन गडकरी : अ‍ॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचा समारोप
Nitin Gadkari
Nitin GadkariSakal

नागपूर : शेतकऱ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने येत्या काळात केवळ प्रदर्शन नव्हे तर वर्षभर मार्गदर्शन करण्यासाठी अ‍ॅग्रोव्हिजनचे कार्यालय तसेच सेंद्रिय बाजाराची स्थापना करण्यात येत आहे. या सोयीमुळे सातत्य कायम राहील आणि वर्षभर शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळेल. कृषी क्षेत्रात समृद्धी आणण्यासाठी पुढाकार घेऊन काम करा व त्यातून सुखी, आत्महत्यामुक्त आणि कर्जमुक्त शेतकरी घडविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यासाठी आपण प्रयत्न करून स्मार्ट शहरांच्या धर्तीवर स्मार्ट व्हिलेजेस उभारू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे आयोजित कृषी प्रदर्शन अ‍ॅग्रोव्हिजनचा थाटात समारोप करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर अरुणाचलचे कृषिमंत्री टागे टाकी, राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार शिशुपाल पटले, डॉ. विकास महात्मे, म्हापसूचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, आयोजन सचिव रवींद्र बोरटकर, गिरीश गांधी, रमेश मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या निमित्ताने आयोजित निबंध स्पर्धेतील विजेते सायली देशमुख, वृषभ शेंडे, श्वेता डोंगलीकर, शेतकरी पुरस्कार गटात शुभम इमले, प्रियंका मेंढे व रेखा पांडव यांना प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, विदर्भाच्या कृषी उन्नयनात अ‍ॅग्रोव्हिजनचा मोठा वाटा आणि सहभाग आहे. येत्या काळात राज्यातील ४५ लाख शेतकऱ्यांना दिवसा सौर वीज उपलब्ध होईल, असेही त्यांनी नमूद केले. हंसराज अहीर यांनी, अ‍ॅग्रोव्हिजनमुळे कृषी क्षेत्रात क्रांती झाल्याचे सांगत शेतकरी जागृत आणि अभ्यासू होत असल्याचे सांगितले. रवींद्र बोरटकर यांनी प्रदर्शनातील घडामोडींचा आढावा घेतला. संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार रमेश मानकर यांनी मानले.

टागे टाकींनी दिली स्पायडरमॅनची उपाधी

अरुणाचल प्रदेशचे कृषिमंत्री टागे टाकी यांनी समारोपीय सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना ॲग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात आम्ही अरुणाचलच्या नागरिकांनी खूप धडे घेतल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील पेरणी, कापणीचे आधुनिक तंत्र पाहून आम्ही खूप प्रभावित झालो. कृषी आणि फलोत्पादन क्षेत्रात आम्ही विकसित होऊ शकलो नाही. गडकरी साहेबांनी रस्त्यांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने आता परिस्थिती बदलत आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे जाळे तयार केल्याने आम्ही गडकरी साहेबांचा उल्लेख आता आदराने ‘स्पायडर मॅन’ असा करतो, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com