महिनाभर 'खेला ना होबे'! निर्बंधामुळे सरावासह क्रीडा स्पर्धांनाही 'ब्रेक', खेळाडूंमध्ये नाराजी

sports
sports

नागपूर : महाराष्ट्र शासनाने आजपासून राज्यात कडक निर्बंध लावल्याने खेळाडूंच्या सरावासह क्रीडा स्पर्धांनाही 'ब्रेक' लागला आहे. निर्बंध येत्या ३० एप्रिलपर्यंत कायम राहणार आहे. परिस्थिती सुधारली नाही तर निर्बंध आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे निदान महिनाभर तरी नागपूर व इतर शहरांमध्ये 'खेला होबे' होणार नसल्याची दाट चिन्हे दिसत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित करून अनेक प्रशिक्षकांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

कोरोनामुळे काही दिवसांचा अपवाद वगळता उपराजधानीतील क्रीडा विश्व जवळपास थांबले आहे. या काळात खेळाडूंना ना सरावाची पुरेशी संधी मिळाली, ना ही क्रीडा स्पर्धा झाल्यात. याचा परिणाम खेळाडूंवर तर झालाच, शिवाय प्रशिक्षण शिबिरांवर उदरनिर्वाह असलेल्या गोरगरीब प्रशिक्षकांनाही मोठा फटका बसला आहे. मिनी लॉकडाउनमुळे महिनाभर 'स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज' पूर्णपणे बंद राहणार असल्याने त्यांची चिंता वाढली आहे. 

आधीच कोरोनाने संपूर्ण वर्ष वाया गेले. त्यात दुसऱ्या लहरीने त्यांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळण्याचे काम केले. क्रिकेटचा अपवाद सोडल्यास खेळामुळे कोरोना झाल्याचे एकही उदाहरण अजूनपर्यंत उघडकीस आले नसताना खेळावरच का निर्बंध लावण्यात येत आहे, असा सवाल काही प्रशिक्षकांनी उपस्थित केला आहे. आमची रोजीरोटी प्रशिक्षण शिबिरांवर अवलंबून असल्याने निदान शासनाने 'सोशल डिस्टन्स'च्या अटींवर तरी सरावाला परवानगी द्यावी, अशी त्यांची मागणी आहे.

मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात बॅडमिंटन प्रशिक्षण शिबिर चालविणारे अमित राऊत म्हणाले, जवळपास एक वर्षांपासून आम्ही बेरोजगार होऊन बसलो आहे. मधल्या काळात काही दिवस थोडाफार सराव झाला. मात्र रुग्ण वाढत असल्याचे कारण देऊन पुन्हा लॉकडाउन लावण्यात आला. सर्वसामान्यांच्या करणीची शिक्षा खेळाडू आणि प्रशिक्षकांनांच का दिली जात आहे. 

क्रिकेट वगळता कोणत्याच खेळाडूला कोरोनाची लागण झाली नाही. असे असतानाही महाराष्ट्र सरकार आयपीएलला परवानगी देते. तोच नियम क्रिकेटतर खेळाडूंना का लावण्यात येत नाही. आमचा बॅडमिंटन खेळ 'नॉन कॉन्टॅक्ट स्पोर्ट्स' आहे. यात सरावाच्या वेळी पूरेसे अंतर ठेवले जाते. शिवाय नागपुरात क्रीडा संकुलसारखे मोठे इनडोअर स्टेडियम आहे, ज्यात विविध वेळात खेळाडू 'सोशल डिस्टन्स' ठेवून सहज सुरक्षित सराव करू शकतात. त्यामुळे सरकारने निदान अन्य खेळाडूंच्या बाबतीत तरी सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी आमची मागणी आहे.

'कोरोनामुळे जवळपास वर्षभरापासून सराव व क्रीडा स्पर्धा बंद आहेत. त्यामुळे अनेक स्पर्धा रद्द झाल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे खेळाडूंना खूप त्रास होत आहे. पुरेशा सरावाअभावी कामगिरीवर विपरित परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत शासनाने खेळाडूंचा गंभीरपणे विचार करावा, अशी माफक अपेक्षा आहे.'
-निकिता राऊत, 
आंतरराष्ट्रीय धावपटू

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com