महापालिकेनं खासगी कंपनीला दिलेले ४६ लाख पाण्यात? सोशल मीडियावर जनजागृतीच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिकेनं खासगी कंपनीला दिलेले ४६ लाख पाण्यात? जनजागृतीच नाही

महापालिकेनं खासगी कंपनीला दिलेले ४६ लाख पाण्यात? जनजागृतीच नाही

नागपूर: कोरोना काळात (Coronavirus) नागरिकांना लसीकरण (Corona Vaccination), चाचण्यांबाबत योग्य मार्गदर्शनाची गरज असताना महापालिकेकडून सोशल मीडियावर (Social Media) जनजागृतीचा अभाव दिसून आला. विशेष म्हणजे महापालिकेचे उपक्रम, नागरिकांपर्यंत उपयुक्त माहिती देण्यासाठी नियुक्त खासगी कंपनी या काळात केवळ बाधित व कोरोनाबळींच्या आकडेवारीपलिकडे काहीच करताना दिसली नाही. त्यामुळे वार्षिक ४६ लाख महापालिका कंपनीला कशासाठी देत आहे? असा प्रश्न चर्चिला जात आहे. (no updates on social media about corona and Vaccination from Nagpur NMC)

हेही वाचा: ब्रेकिंग : गडचिरोलीत पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक; १३ नक्षलवाद्यांचा खात्मा

कोरोनानिमित्त महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पितळ उघडे पडलेच, शिवाय कोरोनासंदर्भातील उपाययोजना, केंद्र सरकारच्या नव्या सूचना, लसीकरणाबाबत योग्य माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यातही महापालिका अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे महापालिकेकडे याबाबत आय क्राफ्ट कंपनी असतानाही प्रशासन त्याचा उपयोग करून घेण्यात कमी पडले. याशिवाय या कंपनीनेही कुठलाही पुढाकार घेतला नसल्याचे दिसून येत आहे.

कंपनीला दरमहा ३ लाख ८९ हजार ४०० रुपये व्यवस्थापन शुल्क देण्यात येते. कंपनीला सोशल मीडियाचे विविध टूल्स वापरून मनपाच्या विशेष मोहीम सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सोपविण्यात आले आहे. कोरोना काळात सध्या महापालिकेचे कोणतेही उपक्रम सुरू नाही. या काळात कोरोनाबाबत तसेच त्या अनुषंगाने येणारी माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणे, एवढेच काम कंपनीकडे होते.

गेल्या काही दिवसात लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वे, आदींमध्ये बदल होत आहे, याबाबत लोकांपर्यंत माहिती पोहोचवून त्यांचा त्रास, मनस्ताप कमी करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. या कंपनीकडून ही कामे करून घेण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. परंतु अद्यापही लसीकरणाबाबत अद्ययावत माहिती दररोज सोशल मीडियावरून दिली जात नाही, परिणामी लोकांना अद्यापही कुठं लसीकरण सुरू माहीत नाही, दोन डोसमधला कालावधी माहीत नाही, परिणामी त्यांना केंद्रावर जाऊन परत यावे लागते आहे. त्यामुळे या कंपनीला ४६ लाख केवळ बैठकांचे वृत्त प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठीच दिले जाते काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे महापालिकेचा जनसंपर्क विभाग बैठकीचे वृत्त प्रसारमाध्यमांपर्यंत पोहोचविण्यात असून यातील कर्मचाऱ्यांवरही वर्षाला १५ लाखांचा खर्च होत आहे.

पुन्हा काढल्या निविदा

खासगी कंपनीकडे पुन्हा सोशल मीडिया, प्रसारमाध्यमांपर्यंत वृत्त पोहोचविण्याच्या कामासाठी महापालिकेने नुकताच निविदा काढल्या. आयटी क्राफ्टसह माय अल्काय कम्युनिकेशन्स, अमित ॲडव्हर्टायझिंग कंपनी, ॲसिन्टवा सोल्यूशन कंपनीनेही निविदा भरल्या आहेत. येत्या काही दिवसांत फायनान्शिअल बीड खुली केली जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने नमुद केले. विशेष म्हणजे आयटी क्राफ्टची मुदत पाच मार्चला संपुष्टात आली.

हेही वाचा: कोरोना नाही तर 'या' आजाराचं मेळघाटातील गावात थैमान

अनधिकृत व्यक्तीकडून माहितीचा पुरवठा

महापालिका आयुक्तांनी एका तरुणाला सोशल मीडियावर महापालिकेसंदर्भातील उपक्रमाची माहिती देण्याचे तोंडी सांगितले असल्याचे समजते. परंतु त्यांची एकूणच भाषा, त्यांच्या इतर पोस्ट बघितल्यास नागरिकांनी त्यांच्यावर विश्वास कसा ठेवावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय या तरुणाकडून सत्ताधाऱ्यांविरोधातही पोस्ट टाकल्या जात असल्याने प्रशासनाकडून माहिती घेत तो विशिष्ट पक्षाचा अजेंडा तर राबवित नाही ना? अशी शंकाही व्यक्त केली जात आहे.

(no updates on social media about corona and Vaccination from Nagpur NMC)

loading image
go to top