esakal | नागपुरात ‘सायकॅट्रिक सोशल वर्कर’ विषयात एम.फिलची सोय! विदर्भातील पहिलाच अभ्यासक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Clinical Psychologists

विदर्भात पहिल्यांदाच ‘सायकॅट्रिक सोशल वर्कर’ विषयात एम.फिलची सोय!

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘सायकॅट्रिक सोशल वर्कर’ (psychiatric social worker) या विषयात ‘एमफिल’ (M Phil) हा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू होणार आहे. विदर्भातील हा पहिलाच अभ्यासक्रम असेल. मानसिक आरोग्य (psychiatric health) संबंधित विषयात अभ्यासक्रम सुरू होणार असल्याने विदर्भातील विद्यार्थ्यांसह रुग्णांनाही याचा लाभ होईल. (now M Phil will available in psychiatric social worker in nagpur)

हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या सदस्यास मारहाण

‘‘सेंटर ऑफ एक्‍सलन्स’’ विकसित करून मानसिक आरोग्य विषयात विशेष पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय दहा वर्षांपूर्वी घेतला होता. नागपुरातील मनोरुग्णालयात सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमाला नाशिकच्या महाराष्ट्र राज्य विज्ञान आरोग्य विद्यापीठाची परवानगी मिळाली आहे. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून निरीक्षण झाल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. या अभ्यासक्रमासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी २८ लाखाचा निधी प्राप्त झाला आहे. राज्यातील सर्वच मनोरुग्णालयात सायकॅट्रिक विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे संकेत आहेत. पुण्याच्या येरवड्यातील मनोरुग्णालयात अशा अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. राज्यातील मनोरुग्णालयात मानसिक रोगविकारतज्ज्ञांचा तुटवडा असल्याने तत्कालीन आघाडी सरकारने प्रादेशिक मनोरुग्णालयात ‘क्‍लिनिकल सायकॉलॉजिस्ट’, ‘सायकॉलॉजिस्ट नर्सेस’, ‘सोशल वर्कर’ असे विशेष अभ्यासक्रम सुरू करून मनुष्यबळ निर्माण करण्याची योजना होती. त्यानुसार, चारही मनोरुग्णालयांतून २०१२-१३ मध्ये प्रस्ताव मागविले होते. नागपूरच्या मनोरुग्णालयातूनही ४८ कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभय गजभिये असताना नागपुरात या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली.

...राज्यातील मानसिक रुग्णालये आणि खाटा -

  • पुणे - २४००

  • ठाणे - १,८००

  • नागपूर - ९४० खाटा

  • रत्नागिरी - ४००

मेयोला मिळाले नाही अत्यावश्यक प्रमाणपत्र -

विदर्भाची लोकसंख्या अडीच कोटीवर आहे. ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये आहेत. मानसोपचार विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाची (एमडी) सोय विदर्भात नाही. उच्च न्यायालयाने पाच वर्षांपूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मेयोत सायकॅट्रिक अभ्यासक्रमात एमडी सुरू करण्यात येणार आहे. मात्र, अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी अत्यावश्यक प्रमाणपत्र मिळाले नाही. यामुळे मेयोत एमडी इन सायकॅट्रिक विषय थंडबस्त्यात आहे. या अभ्यासक्रमाचे प्रात्यक्षिक मनोरुग्णालयात होतील.

एमफिल अभ्यासक्रमासाठी आवश्यक पुस्तकांची यादी नागपूर विद्यापीठाकडून मागवण्यात आली. लॉकडाउनमुळे हा प्रकल्प लगेच सुरू होणार नाही. परंतु, पुढील सत्रापासून अभ्यासक्रम सुरू होतील.
-डॉ. पुरुषोत्तम मडावी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय, नागपूर.
loading image