esakal | रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार; क्वॉरंटाइन कोचेसच्या वापरासंदर्भातही चर्चा सुरु

बोलून बातमी शोधा

corona
रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार; क्वॉरंटाइन कोचेसच्या वापरासंदर्भातही चर्चा सुरु
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः उपराजधानीतील विभागीय रेल्वे रुग्णालय आता कोरोनारुग्णांवर उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. मंगळवारपासून येथे रुग्ण दाखल होण्याचा क्रम सुरू झाला. आपत्कालीन परिस्थितीसाठी उपचाराची सुविधा असलेले कोचेसही रेल्वेने तयार ठेवले आहेत. त्याच्या वापरासंदर्भातही संबंधित यंत्रणेसोबत चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा: गर्भवती मातांनो, कोरोना विषाणूंचा बाळाला धोका नाही; नियमाचं करा पालन

रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार रेल्वेच्या विभागांनी आयसोलेशन कोचेस तयार करून ठेवले आहेत. त्यात मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अशाप्रकारचे ३० कोच तयार केले असून ते नागपूर, वर्धा, आमला येथे ठेवण्यात आले आहेत. त्यात एकूण ६९ बेड उपलब्ध असून ऑक्सिजनयुक्त आहेत. तर आयसीयूची सुविधा असलेले १८ बेड आहे .

याशिवाय अजनीत आरपीएफ बॅरेक परिसरातही आयसोलेशन सेंटर तयार करण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि अपुरे ठरणारे बेड लक्षात घेता रेल्वेने तयार ठेवलेल्या यंत्रणेचा उपयोग करण्याची मागणी जोरात सुरू आहे. याशिवाय कोरोनाग्रस्त रेल्वे कर्मचाऱ्यांवर उपचारासाठी रेल्वे रुग्णालयाला कोविड केयर सेंटर म्हणून कार्यरत करण्याचीही मागणी कामगार संघटनांकडून करण्यात येत होती. भारतीय यात्री केंद्राचे सचिव बसंत शुक्ला यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले होते.

स्थानिक प्रशासनाला या संदर्भात निर्णय घ्यायचा आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रेल्वे यंत्रणेच्या वापरासंदर्भात निर्णय घेण्यास महापालिकेला सांगितले आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेता मध्य रेल्वेने पूर्वीच विभागीय रेल्वे रुग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्यास प्रारंभ केला होता.

हेही वाचा: स्मार्टफोनचा हेडफोन जॅक खराब झालाय का? मग चिंता नको. या पद्धतीनं घरीच करा दुरुस्त

मंगळवारपासून येथे रुग्ण दाखल करण्यात क्रम सुरू करण्यात आला आहे. दाखल रुग्णसंख्येबाबत माहिती मिळू शकली नाही. तूर्त रेल्वे संक्रमित कर्मचाऱ्यांनाच येथे दाखल करून घेतले जात असल्याचे सांगण्यात येते. कोरोना रुग्णाच्या वापरासाठी स्वतंत्र गेटही तयार करण्यात आला आहे.

संपादन - अथर्व महांकाळ