esakal | Nagpur : भाजपचे जिल्हाभर आंदोलन; बावनकुळे यांना घेतले पोलिसांनी ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

OBC Reservation : आघाडीने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला

Nagpur : भाजपचे जिल्हाभर आंदोलन; बावनकुळे यांना घेतले पोलिसांनी ताब्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ओबीसी आरक्षणाशिवाय (obc reservation) जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणूक घेण्याच्या विरोधात आज भाजपने जिल्हाभर आंदोलन करून महाआघाडी सरकारला धडकी भरवली. आघाडीने ओबीसींच्या पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करून रस्ता रोको करणारे भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यातील महाविकास आघाडी सरकर ओबीसी आरक्षणाच्या गंभीर मुद्यावर वेळ मारून नेत आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती. पुरेसा अवधी मिळाल्यानंतरही आघाडीने ओबीसींच्या इम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी काहीच केले नाही. केवळ आयोगाची घोषणा केली. आयोगाला काम करण्यासाठी निधी व मुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही. त्यावरून आघाडी सरकारमधील खासकरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला ओबीसींना आरक्षण द्यायचे नसल्याचे स्पष्ट होते असा आरोप बावनकुळे यांनी केला. नागपूर जिल्ह्यात भाजपने एकूण सर्व मतदारसंघात बारा ठिकाणी आंदोलन केले.

बावनकुळे म्हणाले, गेले सहा महिने आघाडी सरकार ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाबाबत टोलवाटोलवी करत आहे. ओबीसी समाजाचा इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करा, असे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने राज्य सरकारला सातत्याने सांगितले आहे. मात्र आघाडी सरकारने गेल्या सहा महिन्यांत काही हालचालीच केल्या नाहीत. इम्पिरीकल डेटा गोळा करण्यासाठी नेमलेल्या मागासवर्गीय आयोगाला आघाडी सरकारने निधीही दिला नाही. या हलगर्जीचा परिणाम ओबीसी आरक्षणाशिवाय पाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यात झाला आहे.

सत्ताधारी पक्षातील वजनदार गटाला पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकिलच उभा केला नाही असे सत्ताधारी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणतो आहे.विधी व न्याय खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक म्हणविणाऱ्या शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा: देश हादरवण्याच्या कटात जान महंमदचा सहभाग, राकेश अस्थाना मुंबईत

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत असे वारंवार सांगणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण टिकविण्यासाठी काहीच हालचाल केली नाही.ओबीसी समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला. भाजपच्या आंदोलनात शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके,जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, अनिल सोले, भाजपच्या ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष रमेश चोपडे,धर्मपाल मेश्राम,अश्विनी जिचकार,नंदा जिचकार आदी सहभागी झाले होते.

loading image
go to top