थांबेल तो रंगकर्मी कसला? नाट्यस्पर्धेसाठी रंगकर्मींची नवी शक्कल...

nagpur drama competition
nagpur drama competition

नागपूर : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या तोंडावर देशात संचारबंदी सुरू असल्यामुळे नाट्यकर्मींच्या उत्साहावर काहीसे पाणी फिरल्याचे चित्र आहे. अनेक नाट्यसंघांच्या तालमी गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत. नाट्यकलावंताचा उत्साह संचारबंदीतही कायम राहावा या उद्देशाने अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या नागपूर शाखेतर्फे  ‘ऑनलाईन’ नाट्यस्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचा वर्धापन दिन  १४ एप्रिल रोजी  असतो. यंदा हा सोहळा कोरोना संकटामुळेच स्थगित करण्यात आला आहे. मात्र, थांबेल तो रंगकर्मी कसला, या नात्याने नागपूर शाखेने ऑनलाईन नाट्यस्पर्धेची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे घरात बंद असलेल्या रंगकर्मींमध्ये उत्साह संचारला आहे. ‘संकल्पना आमची आविष्कार तुमचा’ या कल्पनेंतर्गत घरी राहूनच नाट्यस्पर्धेत सहभागी होण्याची संधी रंगकर्मींना मिळाली आहे. याची टॅगलाईनच ‘घरबसल्या जोपासू... वारसा कलेचा’अशी आहे.

नाट्य परिषदेचे पदाधिकारी प्रफुल्ल फरकसे, नरेश गडेकर, संजय रहाटे, किशोर आयलवार यांनी ही संकल्पना सादर केली आहे. यात कलावंतांनी व्हिडिओद्वारे पाच ते सात मिनिटाच्या आपल्या सादरीकरणाचे चित्रिकरण करून पाठवायचे आहे. यात एकपात्री, नाट्यछटा आणि स्वगत रंगकर्मींना मोबाईलमध्ये चित्रिकरण करून पाठवता येणार आहे. व्हिडिओ पाठवण्याची अंतिम मुदत १४ एप्रिल आहे.

या स्पर्धेसाठी कुठलीही प्रवेश फी नाही. हे चित्रीकरण घरातीलच असावे. ही स्पर्धा महाराष्ट्र स्तरावर आयोजित करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकास रोख पारितोषिके व स्मृतिचिन्ह तसेच सहभागी कलावंतांना प्रमाणपत्र पुरस्कार वितरण सोहळ्यात देण्यात येतील, अशी माहिती नरेश गडेकर, किशोर आयलवार, संजय रहाटे यांनी दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com