esakal | 'मेडिकल'मध्ये नॉन कोविड रुग्णांचा जीव टांगणीला, फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रियाच होणार

बोलून बातमी शोधा

only important surgery in gmc nagpur

नागपूरच्या मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत विदर्भासह तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश येथील कोरोना तसेच नॉन कोविड आजाराचे गंभीर रुग्ण उपचारासाठी येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. यानंतर मेयोतील सर्जिकल कॉम्प्लेक्स व मेडिकलच्या ट्रॉमा केयर सेंटरमध्ये शासनाने स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू केले

'मेडिकल'मध्ये नॉन कोविड रुग्णांचा जीव टांगणीला, फक्त अत्यावश्यक शस्त्रक्रियाच होणार
sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : मेयोतील सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल तयार करण्यात आल्याने नॉन कोविड रुग्णांवरील शल्यक्रियागृह बंद पडले. त्यामुळे मेडिकलवर नॉनकोविड रुग्णांचा भार वाढला. परंतु, मेडिकलमध्येही कोरोनाबाधितांची गर्दी झाली. यामुळे येथील डॉक्टरांवर ताण वाढला. यामुळे बुधवारी (ता. ७) नॉन कोविड रुग्णांचे व्यवस्थापन केले जाईल, असे सांगताना केवळ अत्यवस्थ रुग्णांवरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यामुळे एकप्रकारे नॉन कोविड रुग्णसेवा थांबवण्याचे आदेश मेडिकल प्रशासनाने काढले. त्यामुळे नॉन कोविड रुग्णांचा जीव टांगणीला आला आहे. 

हेही वाचा - दुर्दैवी! चाऱ्याअभावी जनावरांची भटकंती; शिवार पडले ओसाड, पशुपालक संकटात

नागपूरच्या मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत विदर्भासह तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश येथील कोरोना तसेच नॉन कोविड आजाराचे गंभीर रुग्ण उपचारासाठी येतात. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. यानंतर मेयोतील सर्जिकल कॉम्प्लेक्स व मेडिकलच्या ट्रॉमा केयर सेंटरमध्ये शासनाने स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू केले. मेयोच्या सर्जिकल कॉम्प्लेक्समध्ये बहुतांश विभागाचे शस्त्रक्रियागृह आहेत. त्यामुळे येथील सर्व शस्त्रक्रियांना थांबा लागला आहे. केवळ निवडक शस्त्रक्रिया होतात. मेयोतील नॉन कोविड रुग्णांवरील उपचार थांबल्याने मेडिकलवर भार आला. आठ दिवसांपूर्वी ७०० नॉन कोविडचे रुग्ण मेडिकलमध्ये दाखल होते. मात्र, यातील बहुतांश रुग्णांना सुटी देण्यात आली. कोरोनाबाधित रुग्णांचा भार वाढला असून प्रशासनाकडून सातत्याने खाटा वाढवण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यामुळे येथे सुमारे ८०० खाटा कोरोनाग्रस्तांसाठी सुरू झाल्या आहेत. मात्र, रुग्णसेवा देण्यासाठी नॉन कोविड वॉर्डातील परिचारिकांसह इतरही कर्मचारी हलवावे लागत आहेत. शेवटी कोरोनाबाधितांवर उपचाराचा भार जास्तच वाढल्याने बुधवारी प्रशासनाने नॉन कोविड रुग्णांसाठी कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे हे नवीन रुग्ण न घेण्याचे आदेश काढले. त्यामुळे आता नॉन कोविड रुग्ण वाऱ्यावर असून त्यांचा वाली कोण, हा सवाल नातेवाइकांनी केला आहे. 

हेही वाचा - जिल्हाधिकारी म्हणाले, बेड मिळत नसेल तर संपर्क साधा

सर्वाधिक कोरोनाबाधित मेडिकलमध्ये आहेत. कोरोनारुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज आहे. कोरोनारुग्णांचा भार वाढला. यामुळे नॉन कोविड वॉर्डात परिचारिकांसह इतरही कर्मचारी कमी पडू लागले आहेत. यामुळे मोतीबिंदूसह इतर किरकोळ शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यास सांगितल्या आहेत. ते मनुष्यबळ कोरोनासाठी वापरता येईल. केवळ अत्यावश्यक शस्त्रक्रिया करण्यात येतील. त्यामुळे पहिल्या आदेशाचा विपर्यास झाला. त्याचे शुद्धिपत्रक प्रशासनाने काढले आहे. 
-डॉ. सुधीर गुप्ता, अधिष्ठाता, मेडिकल