सीताबर्डीत आता फक्त 'स्ट्रीट शॉपिंग', वाहनांवर येणार बंदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sitabuldi market nagpur

सीताबर्डीत आता फक्त 'स्ट्रीट शॉपिंग', वाहनांवर येणार बंदी

नागपूर : सीताबर्डी मार्केटमध्ये (sitabuldi market nagpur) आता स्ट्रीट शॉपिंग (street shopping nagpur) आणखी सुलभ होणार असून नागरिकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत (smart city project nagpur) हॉकर्सना मुख्य रस्‍त्यावर जागा नियोजित करून देण्यात येणार असून वाहनांवर बंदी लावण्यात येणार आहे. व्हेरायटी चौकापासून (variety square nagpur) ३०० मीटरपर्यंत हा उपक्रम राबविण्यात येणार असून येथे हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर महाल बाजारपेठेतही अंमलबजावणी केली जाणार आहे.

हेही वाचा: आता डेंगीचा धोका, एकाच महिन्यात २०० पेक्षा अधिक रुग्ण

सीताबर्डी शहराचे मध्यवर्ती ठिकाण असून प्रमुख बाजारपेठही आहे. येथे शहरातीलच नव्हे तर विदर्भातील नागरिक खरेदीसाठी येतात. या बाजारपेठेला नवे स्वरूप देण्यासाठी ‘नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ने कंबर कसली आहे. येथे खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना खरेदीचा आनंद लुटण्यासाठी बाजाराचा ‘लूक’ बदलण्यात येणार असून सुरक्षेचे दृष्टीनेही उपाययोजना करण्यात येणार आहेत. केंद्र सरकारच्या गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाच्या निर्देशानुसार पुरस्कार प्राप्त डिझाईनची चाचणी करण्यासाठी सीताबर्डी मार्केटमध्ये महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुढील १५ दिवस स्मार्ट सिटीच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर व्हेरायटी चौकापासून ३०० मीटरपर्यंत या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.

१५ दिवस लुटा मजा! -

नागरिकांना शॉपिंगचा मुक्त आनंद घेता यावा म्हणून पुढील १५ दिवस व्हेरायटी चौकापासून ३०० मिटर अंतरापर्यंत असलेल्या ‘स्ट्रीट शॉपिंग’ मध्ये नागपूरकरांना शॉपिंगचा मनसोक्त आनंद लुटता येणार आहे.

महाल, ट्रॅफिक पार्क, सक्करदरा स्ट्रीटचेही खुलणार वैभव -

सीताबर्डी येथील उपक्रमाला यश मिळाल्यानंतर महाल बाजारपेठेतही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नेबरहूड साईटसाठी ट्रॅफिक पार्क आणि सक्करदरा तलाव स्ट्रीटची निवड करण्यात आली आहे. या बाजारांत वाहनांना बंदी राहणार असल्याने नागरिकांना प्रदूषणमुक्त वातावरणात स्ट्रीट शॉपिंगचा आनंद लुटता येणार आहे.

सद्यस्थितीत बर्डी बाजारपेठेत मोठी गर्दी असते आणि वाहतुकीच्या वर्दळीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. ‘स्मार्ट सिटी’तर्फे हॉकर्स, वाहने तसेच दुकानदारांसाठी नियोजन केले जात आहे. हॉकर्स संघटनेचे अध्यक्ष रज्जाक कुरैशी व ग्लोकल मॉलचे अनुप खंडेलवाल यांचे सहकार्य घेण्यात येत आहे.
- दयाशंकर तिवारी, महापौर.
बर्डी बाजारपेठेत ‘स्ट्रीट फॉर पीपल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या काळात सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. या नियमाची अंमलबजावणी या उपक्रमाच्या माध्यमाने करण्याचे प्रयत्न आहे.
- राधाकृष्णन बी., आयुक्त, मनपा.
मुख्य बाजारपेठ ‘व्हेईकल फ्री झोन’ असल्यामुळे या रस्त्यावर सर्व प्रकाराच्या वाहनांवर बंदी घालण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांसाठी ई-रिक्षाची व्यवस्था राहील. हा उपक्रम नवीन असून दुकानदारांना व हॉकर्सला मोठ्या प्रमाणात लाभ होईल.
- भुवनेश्वरी एस., मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी.
प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमासाठी दुकानदार, हॉकर्स व नागरिकांची प्रतिक्रिया घेतल्यानंतर पुढील उपाययोजना करण्यात येईल. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांना वॉकिंग फ्रेंडली’ बाजारपेठ उपलब्ध करून देणे आहे.
- डॉ. प्रणीत उमरेडकर, पर्यावरण विभागप्रमुख, स्मार्ट सिटी.

Web Title: Only Street Shopping In Sitabuldi Market Of Nagpur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpur
go to top