L. N. Hardas : आंबेडकरी क्रांतीनाद असलेल्‍या ‘जयभीम’चे जनक हरदास यांचे स्मारक कधी?

सरकारकडून नाही दखल ः रिपब्लिकन नेत्यांनाही विसर
originate jai bhim political leader and social reformer babu hardas monument issue
originate jai bhim political leader and social reformer babu hardas monument issueSakal

Nagpur News : दीक्षाभूमीवरील धम्मक्रांतीचा सोहळा असो की, चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीतील महापरिनिर्वाणदिन... किंवा दोन आंबेडकरी माणसांच्या भेटीचा क्षण... सर्व ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या मुखातून एकच आवाज निनादतो, तो म्हणजे ‘जयभीम’.

जयभीम ही आंबेडकरी समाजाची अस्मिता आहेत. एकमेकांना अभिवादन करण्यासाठी ‘जयभीम’ हा क्रांतिकारक शब्द देणारे बाबू हरदास एल. एन. मात्र अजूनही उपेक्षित आहेत.

आंबेडकरी समाजातील राजकारणात गटा-तटात विभागलेले नेते असोत वा भरकटलेले रिपब्लिकन नेतेच नव्हे तर, काँग्रेस, भाजप, डाव्या पक्षात स्थिरावलेले नेते असोत, त्यांच्या मुखातूनही ‘जयभीम’ हाच क्रांतीनाद बाहेर येतो.

हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बौद्ध धम्माची स्वतंत्र वाटचाल अंगिकारल्यानंतर बौद्धांना नवी ओळख प्राप्त व्हावी, यासाठी ‘जयभीम’ हा शब्द मोठ्या आदरभावाने संबोधला जातो. क्रांतीची पेरणी करणारा ‘जयभीम’ हा शब्द देणारे हरदास लक्ष्मणराव नगराळे ऊर्फ बाबू हरदास एल. एन. यांचा जन्म ६ जानेवारी १९०४ रोजी नागपुरातील कामठी येथे झाला.

वडील लक्ष्मणराव नगराळे रेल्वे खात्यात होते. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. संस्कृतवरही त्यांची पकड होती. अवघ्या १७ व्या वर्षी ‘महारठ्ठ’ नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला.

कामठी येथे रात्र शाळा चालवली. ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्‍लासेस फेडरेशन’च्या पदावर सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९२४ साली त्यांनी ‘मंडल महात्मे’ हा ग्रंथ लिहिला. ‘वीर बालक’ नावाचे नाटकही लिहिले. बाबासाहेबांच्या ‘जनता’ वृत्तपत्रातही त्यांनी लेखन केले.

१९३७ साली नागपूर-कामठी या मतदारसंघातून ते निवडून आले होते. बाबू हरदास यांचे १२ जानेवारी १९४० साली अवघ्या ३५ व्या वर्षी निधन झाले. इतके महान कार्य असताना, त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे स्मारक तयार करण्याची मागणी सरकारला करण्यात आली होती.

मात्र, आजही त्याबाबत साधा विषयही मांडण्यात आलेला नसून रिपब्लिकन नेत्यांकडूनही दुर्लक्षित झाल्याचे दिसून येते.

‘मॅकडोनाल्ड’ यांच्‍याशी ३२ वेळा पत्रव्यवहार

१९२८ साली हरदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली. बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेत गेल्यानंतर अस्पृश्‍यांचा नेता कोण, असा सवाल पुढे आल्यानंतर बाबू हरदास एल. एन. यांनी रॅमसे मॅक्‍डोनाल्ड यांना भारतातून ३२ तार पाठवून देशात अस्पृश्‍यांचे नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत, असे सुचविले. यासाठी त्यांनी मॅकडोनाल्ड यांच्याशी जवळपास ३२ वेळा पत्रव्यवहार केला होता.

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत म्हणून हरदास एल. एन. यांचे नाव इतिहासात कोरले आहे. निष्ठावंत कार्यकर्ते घडविण्यासाठी यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. मात्र, या कामठीत त्यांचे प्रेरणादायी स्मारक नाही. कामठीत हरदास मेळा भरतो; परंतु रिपब्लिकन नेत्यांना ‘जयभीम’चे जनक बाबू हरदास यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करावेसे वाटत नाही. समाजही त्यांच्याबाबतीत अज्ञानी असल्याने बाबू हरदास अद्यापही दुर्लक्षितच राहिले. कामठीत त्यांचे स्मारक उभारावे.

- भन्ते नागदीपंकर थेरो, मुख्य मार्गदर्शक, हरदास मेळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com