esakal | प्राणवायू घेऊन पोहोचली ऑक्सिजन एक्स्प्रेस; उपराजधानीला मिळाले तीन टँकर

बोलून बातमी शोधा

oxygen express
प्राणवायू घेऊन पोहोचली ऑक्सिजन एक्स्प्रेस; उपराजधानीला मिळाले तीन टँकर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औषधांसह ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकारकडून ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी राज्य सरकारकडून युद्धपातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. विशाखापटणम येथून प्राणवायू घेऊन निघालेली पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता नागपूर स्टेशनवर दाखल झाली. एकूण शंभर मेट्रिक टन लिक्विड ऑक्सिजन असलेले सात टँकर घेऊन पोहोचलेल्या या गाडीतून नागपुरात ३ टँकर उतरविल्यानंतर ही एक्स्प्रेस नाशिकच्या दिशेने रवाना झाली.

हेही वाचा: दहावी परीक्षा रद्द झाल्याने अकरावी प्रवेशाला येणार 'अच्छे दिन'; जाणून घ्या राज्यातील विभागनिहाय जागा

कोरोना रुग्णावर उपचारासाठी राज्य सरकारकडून परराज्यातून ऑक्सिजनची जुळवाजुळव करण्यात येत आहे. भारतीय रेल्वेच्या रो-रो सेवे अंतर्गत विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन वाहून आणण्यासाठी रिक्त मालगाडी पाठविण्यात आली आहे. सोमवारी रात्री कळंबोली येथून १६ टन क्षमतेचे सात रिकामे टँकर घेऊन पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली होती. गुरुवारी सकाळी विशाखापटणमला पोहोचली.

तेथील स्टील प्लांट सायडींगमधून सात टँकरमध्ये वैद्यकीय उपयोगाचा प्राणवायू घेऊन ही ट्रेन शुक्रवारी रात्री नागपूर स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ पोहोचली. टँकर उतरवून घेण्यासाठी पूर्वीच रॅम्प तयार करण्यात आला होता. स्थानिक प्रशासकीय अधिकारी व रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रॅम्पवरून तीन टँकर येथे उतरवून घेण्यात आले. त्यानंतर चार टँकर घेऊन ही एक्प्रेस नाशिकच्या दिशेने रवाना झाली. शनिवारी सकाळपर्यंत ती नाशिकला पोहोचण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: कोरोनाने सर्वच व्यवसाय हादरले मात्र डांगराच्या उत्पादनाने सावरले; लॉकडाउनमध्ये आर्थिक आधार

अवघा महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून ऑक्सिजनच्या तुटवड्याचा सामना करीत आहे. ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांवरील उपचारातही मर्यादा आल्या आहेत. ऑक्सिजनची पर्यायी जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. पण, त्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. अशावेळी रेल्वेने पोहोचणारा ऑक्सिजनचा साठा रुग्णावर उपचारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. येवढेच नाही तर गरजेनुसार देशाच्या अन्य भागात ऑक्सिजन वाहून नेण्याच्या दृष्टीने हा पथदर्शी उपक्रम ठरणार आहे.

संपादन - अथर्व महांकाळ