
नागपूर : मी, पती आणि अवघा चार वर्षाचा आमचा मुलगा... आम्ही तिघे पहलगामासाठी रवाना होणार... तोच पहलगामात हल्ला झाल्याची वार्ता कळली आणि आम्ही पहलगामला जाणे रद्द केले. मात्र श्रीनगरमध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहोत, त्या हॉटेलमधील सारे पर्यटक चेक आऊट करीत होते. काही वेळात हॉटेल रिकामे झाले. हा अनुभव कथन करत असताना प्रीती नासरे यांच्या आवाजात कंपन होते. मनात प्रचंड भीती होती. तर मानसिक धक्का बसला असल्याचे फोनवरून बोलताना जाणवत होते.