esakal | कोरोना वॉर्डात प्यायला पाणी मिळेना, इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील प्रकार

बोलून बातमी शोधा

mayo
कोरोना वॉर्डात प्यायला पाणी मिळेना, इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयातील प्रकार
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) कोविड हॉस्पिटलमध्ये पाणी नसल्यामुळे रुग्णांची आरडाओरड सुरू झाली आहे. अनेक रुग्णांनी येथील डॉक्टर, परिचारिका यांच्याकडे तक्रार केली. परंतु, रुग्णांच्या समस्यांकडे कोणाचेही लक्ष नाही. गेल्या दोन दिवसांपासून पाण्यासाठी येथील रुग्ण टाहो फोडत आहेत. मात्र, त्यांच्या समस्या कोणीही ऐकून घेण्याच्या तयारीत नसल्याची तक्रार एका रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. रुग्ण मेयोत दाखल असल्याने त्यांनी नाव सांगण्यास नकार दिला.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

मेयोतर्फे महापालिकेला दरमहा पाण्यासाठी सुमारे पाच लाख रुपये पाणीपट्टी भरावी लागते. त्यानंतरही मेयोत अशाप्रकारे ऐन कोरोना काळात पाणीटंचाईचा सामना रुग्णाना करावा लागत आहे. रुग्णांना पिण्यासाठी पाणी नाही. नातेवाईक पाणी पोहोचवण्यासाठी वॉर्डात जाऊ शकत नाही. पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाणी खरेदीशिवाय पर्याय नसल्याने नातेवाईकही संताप व्यक्त करीत आहेत.

पाणी समस्येबाबत अनभिज्ञ -

मेयोच्या कोरोना वॉर्डात पाण्याचे दुर्भिक्ष आहे, ही पाणी समस्या सोडविण्यासंदर्भात प्रशासनाला विचारणा केली असता पाणी समस्या आहे, याबाबत कोणतीही माहिती त्यांच्याकडे नाही. मात्र, पाणी समस्या असेल तर ती त्वरीत सोडवण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले.