
नागपूर : शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजनची फुटलेली पाईपलाईन चार दिवस होऊनही दुरुस्त झालेली नाही. त्यामुळे ऑक्सिजनची गरज असेलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. चार दिवस उलटूनही पाईपलाईन दुरुस्त न होणे, हे दुर्दैवी आहे. राज्याचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष आणि आमदार प्रवीण दटके यांनी केली आहे.
आमदार दटके म्हणाले, ३ सप्टेंबरला रस्त्याचे काम सुरू असताना मेडिकलला ऑक्सिजनचा पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. आज ७ तारीख उलटून गेली तरीही ती पाईपलाईन दुरुस्त झालेली नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निधीतून दोन महिन्यांपूर्वीच कोविडच्या रुग्णांसाठी जे तीन वार्ड तयार करण्यात आले, त्यासाठी ऑक्सिजनची पाईपलाईन टाकण्यात आली होती.
एवढ्या लवकर तिची दुर्दशा होईल, असे वाटले नव्हते. कालपासून येथील सर्व कोरोनाचे रुग्ण हालवले जात आहेत. कोरोनाचा नवीन रुग्ण मेडिकलमध्ये घेतला जात नाही. मेयोमध्ये (इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय) रुग्णांची व्यवस्था करायला सांगितले होते. पण तेथेही कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
मेयोमध्ये १२ डॉक्टर, १२ परिचारिका आणि १२ वॉर्डबॉय देऊ, असं सांगण्यात आले होते. पण तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी नागपुरच्या कोरोणा रुग्णांची, विशेषतः ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे, त्यांची स्थिती गंभीर आहे. राज्याचे आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, विभागीय आयुक्त, महापालिकेचे आयुक्त यांनी विशेष लक्ष देऊन ऑक्सिजनची व्यवस्था सुरळीत करावी.
हे काम तत्काळ होणार नसेल, तर मेयो रुग्णालयात सर्व कोरोना रुग्णांची व्यवस्था करावी आणि तेथे डॉक्टर आणि आवश्यक कर्मचाऱ्यांची उपलब्धता करुन द्यावी, असे दटके म्हणाले. मेडिकल आणि मेयो हे दोन्ही रुग्णालय गरीब व मध्यमवर्गीयांसाठी मोठा आधार आहेत. आज कोरोनाने जी स्थिती निर्माण झालेली आहे. अशा स्थितीत या दोन्ही रुग्णालयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असेही आमदार दटके म्हणाले.
संपादन : अतुल मांगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.