Nagpur News : नागपूर शहरातील पब, बारवर पोलिस आयुक्तांचा वार; आठ बार ‘सील’ करण्यासाठी दिले पत्र

वेअर हाऊससमोरही अनेक गुंडांमध्ये राडा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या पब आणि बारवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती.
Police action on pubs bars in nagpur city Letter given sealed eight bar
Police action on pubs bars in nagpur city Letter given sealed eight barSakal

नागपूर : पुण्यात एका अल्पवयीन मुलाने मध्यरात्री नशेत गाडी चालवत दोघांना चिरडले. अवघा महाराष्ट्र या प्रकाराने संतापून उठला असून व्यसनाधीन अल्पवयीन आणि शहरातील पब कल्चरचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

नागपूर शहरातही नाईट कल्चरमुळे पब आणि बार संस्कृती चांगलीच फोफावली असून युवकांचाही तिथे धिंगाणा वाढला आहे. त्यामुळे अशा बार आणि पबवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी शहरातील सहा पब आणि दोन बार वर कारवाईचा बडगा उगारत त्यांच्यावर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदविल्याची माहिती समोर आली आहे.

रंगोली बीअर बार आणि ग्रीन हॉटेल ॲण्ड बार अशी बारची तर डिजो द लक्झरी लाउन्ज, पॅरेडाईज पब, बॅरेक कॅफे पब, सायक्लॉन पब, एजन्ट जॅक आणि वेअर हाऊस ही कारवाई करण्यात आलेल्या पबची नावे आहेत.

शहरात गेल्या काही वर्षांत बार आणि पबची संख्या वाढली आहे. या माध्यमातून हुक्का पार्लर आणि एमडी विक्रीचे प्रमाणही वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत बार आणि पब सुरू ठेऊन नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचेही सातत्याने समोर आले आहे.

विशेष म्हणजे, अंबाझरी हद्दीत पोलिसांनी एका बारवर केलेल्या कारवाईत तो रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत सुरू असल्याचा प्रकार समोर आला होता. दुसरीकडे, सायक्लॉन पबमध्ये हुक्का पार्लरवरही पोलिसांनी छापा टाकला होता. याशिवाय इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एजन्ट जॅक आणि वेअर हाऊस या पबमध्ये गुंडाची गर्दी वाढली होती. त्यातून एका नेत्याच्या मुलाला काही कुख्यात गुंडांनी मारहाण केल्याची घटना घडली होती.

वेअर हाऊससमोरही अनेक गुंडांमध्ये राडा झाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे या पब आणि बारवर कारवाई करण्याची मागणी सातत्याने होत होती. या सर्व प्रकारांची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्तांनी या पब आणि बारला नोटीस बजावली होती. पण नोटीसीनंतरही बार आणि पब परिसरात अंमली पदार्थांची विक्री, नियमित वेळेत ते बंद करण्यात येत नसल्याची बाब समोर आली होती.

त्यातून पोलिस आयुक्तांनी या आठही बार आणि पबविरोधात एनडीपीएस आणि संघठीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करीत अंबाझरी, इमामवाडा, प्रतापनगर, एमआयडीसी या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे आठही बार आणि पब सील करण्यासाठी पत्रव्यवहारही केला आहे.

पोलिसांकडून अनेकदा नोटीस

शहरात सुरू असलेले बार आणि पब नियमानुसार चालविण्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांनी वेळोवेळी निर्देश दिले होते. यामध्ये प्रामुख्याने फेब्रुवारी महिन्यात अंमली पदार्थाची विक्री होण्याबाबत नोटीस बजावली होती. त्यानंतर मार्च महिन्यात १४४ फौजदारी दंड सहिता अंतर्गत नोटीस बजावली होती. त्यानंतर ४ एप्रिललाही नोटीस बजावली होती. मात्र, आठही पब आणि बारने त्याचे उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आली.

पुण्यातील घटनेनंतर सतर्क

पुण्यात दारूच्या नशेत अल्पवयीन मुलाने दोघांना चिरडण्याचे प्रकरण ताजेच आहे. या मुलाने रात्री पबमध्ये उशिरापर्यंत दारू पिऊन कार चालवित दोघांना आपल्या वाहनाने उडविले. शहरातील बार आणि पब हे रात्री उशिरापर्यंत सुरू असून त्यातून अशी कुठलीही घटना घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. त्यातूनच पोलिस आयुक्तांनी बार आणि पबवर कारवाईचा धडाका लावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com